मुंबई : प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवात संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्माचाऱ्यांच्या आनंदात भर घातली आहे. शासनाच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के झाला आहे.
त्याचप्रमाणे असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरून वाढवून महागाई भत्ता २१२ टक्के करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. यामुळे राज्य शासनावर एकंदर ९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
शासनाच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२३ पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता दिला आहे. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनासुद्धा मिळायला हवा होता, पण तो अद्याप मिळालेला नाही. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळत असून त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता मिळायला हवा होता. पण एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप ३४ टक्के इतकाच महागाई भत्ता मिळत असल्याचेही कर्मचारी संघटनांनी म्हटले.
यापूर्वी जून महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. या संदर्भात जून महिन्यात राज्य सरकारने निर्णय जाहीर करत महागाई भत्ता वाढवण्याचे जाहीर केले होते.
.jpeg)