राष्ट्रवादीचा निकाल ६ ऑक्टोबरला

 


निवडणूक आयोग देणार निर्णय 

 मुंबई : राष्ट्रवादीत ( NCP)  अजित पवारांच्या बंडखोरीमुळे उभी फूट पडली. त्यामुळे संपूर्ण पक्षात असंतोष निर्माण झाला होता. काही आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा तसेच राष्ट्रवादीचे चिन्ह कोणाचे याबाबत ६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात ( Election commission) पोहोचला आहे. अजित पवार गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. या दिवशी अजित पवार व शरद पवार (Sharad Pawar) गट निवडणूक आयोगासमोर आपली बाजू मांडणार आहेत.

पक्षात फूट पडल्यानंतरही शरद पवार गटाकडून मोकळेपणाने याला दुजोरा दिला नव्हता. मात्र अजित पवार गटाकडून पक्ष चिन्ह याबाबत याचिका दाखल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे मान्य केले आहे. ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोग खरा पक्ष कोणाचा तसेच त्याच्या संबंधित इतर प्रश्न याबाबत निर्णय देणार आहे.

यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. शरद पवार गटाकडून पक्षात फूट पडली नसून शरद पवार हेच अध्यक्ष असल्याबाबत सांगण्यात आले आहे.  अजित पवारांनी २ जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे.

शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होत आहे. पहिल्यांदा अपात्र आमदारांचा आकडा समोर आला असून फुटलेल्या नऊ मंत्र्यांविरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केलेली आहे. मात्र या नऊ मंत्र्यांशिवाय ३१ आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. या शिवाय अजित पवार गटाने केलेले दावे देखील शरद पवार गटाने फेटाळले आहेत. २०२२ मध्ये जी राष्ट्रीय कार्यकारणी झाली त्याचे देखील दाखले देण्यात आले आहे. त्या प्रक्रियांचे पालन करत नसल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे.

Tag : # शरद पवार # अजित पवार # निवडणूक आयोग # राष्ट्रवादीचा निकाल # पक्ष आणि चिन्ह याचा होणार निर्णय 

Post a Comment

Previous Post Next Post