गावकऱ्यांची निर्धार सभेला मोठी गर्दी
दिवा,(आरती मुळीक परब) : दिवा शहरातील शेवटच्या आगासन गावात ठाणे महानगरपालिकेने टाकलेल्या विविध सेवा सुविधांच्या आरक्षणा विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी रविवारी सभा घेऊन विरोध दर्शवला. या सभेत शेतकऱ्यांच्या जमिनीवर, घरांवर टाकण्यात आलेली आरक्षण रद्द करावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी म्हटले आहे.
आगासन गावातील ३० वर्षापूर्वीची राहती घरे व खाजगी शेत जमिनींवर आरक्षण ठाणे महापालिकेने टाकल्याने त्याच्या विरोधात आगासन गावातील दत्त मंदिरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शक म्हणून राजाराम पाटील, संतोष केणे, गजानन पाटील, आगासन गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोहिदास मुंडे, वंदना गौरी, गुरुनाथ नाईक, विनोद भगत, तुषार पाटील, रेशमा पवार, मधुकर माळी, प्रेमनाथ पाटील, महेश संते, दयानंद म्हात्रे, प्रभात पर्व न्यूज चे संपादक सागर राजे, इतर प्रसार माध्यमे तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व आगासन गावातील जवळपास 500 पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी या आरक्षणाला ठामपणे विरोध दर्शविला आहे. सर्व लोकप्रतिनिधी, खासदार व मुख्यमंत्री यांना आरक्षण तात्काळ रद्द करावे, अशी विनंती ग्रामस्थांनी ठामपणे केली आहे. तसेच आगरी कोळी संघर्ष समिती (आगासन दातिवली, बेतवडे, म्हातार्डी, दिवा व साबे) यांचा देखील आरक्षणाला विरोध आहे, असे समर्थन पत्र दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील आगासन ग्रामस्थांना पाठिंबा दिला आहे. मनसेच्या वतीने शहर प्रमुख तुषार पाटील यांच्याकडूनही या आरक्षणाच्या विरोधाचे समर्थन पत्र आगासन गाव संघर्ष समितीला दिले आहे.
Tags
महाराष्ट्र

