लढ्याच्या शेवटी शेतकऱ्यांसोबत मी ही कोयता काढेन- आ. राजू पाटील

 


मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली आरक्षण बाधित आगासन वासियांची भेट 

दिवा, (आरती मुळीक परब ) :  दिव्यातील आगासन गावात आरक्षणाविरोधात स्थानिक भूमीपूत्र, शेतकरी एकवटले आहेत. त्यांनी दिव्यातील आगासन, दातिवली, बेतवडे, म्हातार्डी, दिवा व साबे या सहा गावांमधील आगरी, कोळी समाजाला एकत्रित करुन लढा सुरु केला आहे. आज त्या सर्व स्थानिक भूमीपूत्र, शेतकऱ्यांना आमदार राजू पाटील यांनी भेट देऊन मनसेचा जाहीर पाठिंबा दिला.

दिव्यातील आरक्षित भूखंडावर स्थानिक नगरसेवकांच्या आशिर्वादाने बेकायदा बांधकामे झाली. तेव्हा त्यांच्यावर काही कारवाई केली गेली नाही. आता भूमीपूत्रांच्या मोकळ्या जागेवर आरक्षण टाकले जात आहे. ही काही मोगलाई नाही. कुणीपण येईल, आम्हाला पैसे देईल आणि आमच्या जागा घेईल. भूमीपूत्रांच्या जमीनीवर कचऱ्याचे प्रकल्प आणले जात आहेत. २७ गावांवर अनेक आरक्षणे टाकून ठेवली आहेत. लढ्याच्या शेवटी पर्याय नसल्यास अशा वेळी आम्ही काय हातावर हात ठेऊन बसणार नाहीत तर आमच्याकडे असणारे हत्यार आम्ही काढू. मी ही स्थानिक भूमीपूत्र, शेतकऱ्यां अन् महिलांसोबत कोयता काढणार, असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी आगासन येथे भूमीपूत्रांच्या बैठकीत आज केले आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीतील आगासन परिसरातील ३५ एकर जागेवर प्रशासनाकडून आरक्षण टाकण्यात आले आहे. पोलीस ठाणे, बसस्टॅण्ड, मार्केट, जलकुंभ, पालिका प्रभाग कार्यालय, हॉस्पिटल, वाहनतळ, अग्निशमनतळ, १५ मीटर रोड आदी आरक्षणे टाकली गेली आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वे झाला. सर्वेनंतर स्थानिक भूमीपूत्र प्रचंड नाराज झाले आहे. आगासन येथील मंदिरात स्थानिक भूमीपूत्रांची, शेतकऱ्यांची आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे रोहिदास मुंडे, मनसे आमदार राजू पाटील, मनसे शहर प्रमुख तुषार पाटील हे उपस्थित होते.

या बाबत स्थानिक भूमीपूत्र उदय मुंडे यांनी सांगितले की, स्थानिक शेतकऱ्यांची जागा आहे. आमची तिसरी पिढी या ठिकाणी शेती करीत आहे. पूर्वी प्रशासनाने दिव्यात असणाऱ्या आरक्षित जागेचे भूसंपादन केले नाही. त्याठिकाणी लक्ष न देता बेकायदा बांधकामे झाली. आता जी सरकारी जमीन आहे, त्याठिकाणी पैसे ही द्यावे लागणार नाही. त्या जागा ही ते ताब्यात घेत नाही. तिथे तर त्यांना पैसे पण द्यावे लागणार नाहीत. असे न करता आमच्या जागेवर आरक्षण टाकतात. खाजगी जमीनीवर आरक्षणे टाकल्याने आम्ही भूमीहीन होत आहोत. आमच्या मुलांनी मग कुठे जायचे. आगासन हे ठाणे महापलिकेतील दिव्यातील शेवटचे गाव आहे. येथे होणाऱ्या बुलेट ट्रेनच्या स्थानकाजवळ ह्या सगळ्या सोयी होत आहेत. यात स्थानिक बिल्डरांचे साटे लोटे आहे.


Post a Comment

Previous Post Next Post