मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ने कडक पाऊल उचलत प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणार्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी सुमारे १०० साइट्स आणि कंपन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांची वीज आणि पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी, MPCB ने JSW ग्रीन सिमेंट आणि CEAT टायर्सना वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बंद करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रविवारी हवेचा दर्जा निर्देशांक 'खराब' म्हणून नोंदवला गेला.
मुंबईत पायाभूत सुविधा प्रकल्प आणि निवासी संकुलांसाठी सुरू असलेल्या बांधकामांमुळे वाढत्या प्रदूषणात आणि हवेची गुणवत्ता ढासळण्यास हातभार लागला आहे, त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने एसपी सिंगला कन्स्ट्रक्शन, जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड, रेझोनंट रियल्टर्स प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि लोणावळा कन्स्ट्रक्शन कंपनीसह कंपन्यांना नोटीस जारी केल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
मुंबईतील चार प्लांटनाही स्वच्छ हवेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. खराब हवेच्या गुणवत्तेच्या समस्येतम या प्लांट्सचा महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे आढळून आले आहे.
प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानेही शहरात आपले निरीक्षण आणि कमी करण्याच्या उपायांमध्ये वाढ केली आहे. १४ ठिकाणांव्यतिरिक्त जेथे हवाई निरीक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, MPCB सात मोबाईल एअर मॉनिटरिंग व्हॅनचा वापर करण्यात येत आहे.
