पालिकेचे दुर्लक्ष
वाहतूक पोलिसांचाही कानाडोळा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : गर्दीच्या व वाहतुकीस अडथळा होईल असा ठिकाणी फटाके विक्री करण्यास पालिकेची परवानगी नसतानाही सर्रासपणे पालिकेच्या व वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून फटाके फटाके विक्री स्टॉल लावण्यात आले.पालिका प्रशासन मात्र याकडे बघ्याची भूमिका घेत असल्याने काही दुर्घटना घडल्यास पालिका व वाहतूक पोलीस जबाबदारी घेतील का असा प्रश्न डोंबिवलीकर विचारीत आहेत.
डोंबिवली पूर्वेला पालिकेच्या विभागीय कार्यायासमोरील चक्क रस्त्यावर फटाके विक्री स्टॉल लावण्यात आला आहे.या स्टॉलमुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असून वाहतूक पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.तर पालिका प्रशासनाला याची माहिती असून अपघात झाल्यावर रस्त्यावर स्टॉलवर कारवाई केली जाईल का असा प्रश्न नागरिक विचारीत आहे.
शहरातील गर्दीच्या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून फटाके विक्रीस कल्याण डोंबिवली महापालिकेने बंदी जाहीर केली असताना डोंबिवलीतील फ आणि ग प्रभागात विविध ठिकाणी बांबू, कपड्यांच्या छोटे स्टाॅल उभारून फटाके विक्री सुरू करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने नेहरू मैदान आणि हभप सावळाराम महाराज क्रिडा संकुल येथे परवानगी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांच्या दुकानांना आगी लागण्याचे प्रकार वारंवार घडल्यामुळेच पालिकेने गर्दी किंवा वर्दीळीच्या ठिकाणापासून दूर फटाके विक्री करण्यासाठी परवानगी देत असते. पालिकेच्या अग्निशमन दलाचे याबाबत कडक नियम असतात. परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून डोंबिवलीत फटाके विक्री सुरू केली आहे. प्रभाग अधिकारी, अग्निशमन दल याबाबत काय कारवाई करणार की दुर्लक्ष करणार अशी विचारणा होत आहे.
