नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात पोलीस परेड मैदानावर एक वादग्रस्त प्रसंग घडला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
कार्यक्रमादरम्यान दर्शना सौपुरे (वनरक्षक) व माधुरी जाधव (वनविभाग) यांनी घोषणाबाजी करत डॉ. बाबासाहेबांचे नाव का वगळले, असा थेट सवाल केला. परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही महिलांना कार्यक्रमस्थळावरून बाजूला केले व नंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या. वंचित बहुजन आघाडीने या महिलांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर करत, महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. पक्षाच्या नाशिक कमिटीने पोलीस ठाण्यात जाऊन दोन्ही कर्मचाऱ्यांना भेट देत त्यांचे समर्थन केले व सन्मानही केला.
दरम्यान, घोषणाबाजी करताना दर्शना सौपुरे व माधुरी जाधव यांनी, “ज्यांच्यामुळे आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करतो, त्या राज्यघटनाकारांचे नाव भाषणात नसणे दुर्दैवी आहे. डॉ. बाबासाहेबांनी सर्वांना समान हक्क दिले असून त्यांचे नाव पुसण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही सहन करणार नाही,” अशी भूमिका मांडली. या घटनेमुळे नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला वेगळे वळण लागले असून सामाजिक व राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

