सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी


एकाचा मृत्यू तर अनेक जखमी 

सुरत : दिवाळीनिमित्त प्रत्येक नागरिकाला घरी जाण्याची ओढ लागलेली असते. त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहायला मिळते. अशीच गर्दी सुरत रेल्वे स्थानकावर देखील झाली होती. यावेळी ट्रेन स्थानकावर येताच प्रवाशांनी चढण्यासाठी एकच गर्दी केली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यावेळी एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर तीन ते चार जण बेशुद्ध झाल्याची घटना घडली. यामुळे रेल्वे प्रशासनावर टीका केली जात आहे. तसेच ज्यांचे तिकीट आरक्षित आहे अशांना देखील ट्रेनमध्ये चढण्यास अडचणी होत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

सुरत रेल्वे स्थानकावरून बिहारला जाणारी ताप्ती गंगा एक्सप्रेस स्थानकावर येताच प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढण्यासाठी गर्दी केली. यामुळे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. यावेळी तीन ते चार जण चेंगराचेंगरीत बेशुद्ध पडले, यावेळी मोठी खळबळ उडाली. काही कळायच्या हात चेंगराचेंगरी इतकी भयानक झाली की बेशुद्ध पडलेल्या पैकी एकाची प्रकृती खालावली. त्याला सीपीआर देऊन वाचवण्यात प्रयत्न करण्यात आले. यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अंकित वीरेंद्र सिंह असे मृताचे नाव आहे. अंकितच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच अंकितच्या मृत्यूचे कारण समजणार आहे. इतर दोन प्रवाशांनाही श्वसनाचा त्रास झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे एसएमआयएमईआरच्या डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर सुरतच्या खासदार आणि केंद्र सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचल्या होत्या.

सुरतमधील हिरे आणि कापड उद्योगात गुंतलेले अनेक कामगार छठपूजेसाठी बिहार आणि उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी जातात. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर रेल्वे स्थानकावर गर्दी झाली होती. तर दिवाळीत पश्चिम रेल्वे ४६ जोड्या स्पेशल ट्रेन्स चालवणार आहे. ज्यात ४०० वेगवेगळ्या स्थळी फेरफटका मारला जाणार आहेत, त्यापैकी २७ जोड्या सुरत किंवा उधना रेल्वे स्थानकांवरून सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वेने दिली आहे. 

 गुजरातच्या वडोदरा येथील एका प्रवाशाने कन्फर्म तिकीट असूनही ट्रेनमध्ये चढता न आल्याने आपली निराशा व्यक्त केली.  त्यांनी रेल्वे व्यवस्थापनावर टीका केली आणि असा दावा केला की पोलिसांनी गोंधळलेल्या परिस्थितीत कोणतीही मदत केली नाही.



Post a Comment

Previous Post Next Post