दिवा, (आरती मुळीक परब) : ठाण्यातील मुंब्र्यात शिवसेना शाखेवरून गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा राडा झाला. त्यावेळी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट आमने- सामने आले होते. त्यानंतर ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शाखा शिंदे गटाने मिळवून त्यावर बुलडोझर चालवून ती उद्ध्वस्त केली. तर काल त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले.
ठाणे शहरातील बऱ्याच भागातील शिवसेना शाखांचा वाद कित्येत महिने पेटतो आहे. ठाणे शहरात शाखेसाठी नेहमी ठाकरे गट आणि शिंदे गट आमने- सामने आलेत. तसेच मुंब्र्यातही शिंदे गट आणि ठाकरे गट ही मुंब्र्यातील मध्यवर्ती शिवसेना शाखेवरुन गेल्या आठवड्यात आमने- सामने आले होते.
ही मुंब्रा येथील शिवसेनेची मध्यवर्ती शहर शाखा उबाठाचे मुंब्रा शहर प्रमुख विजय कदम यांनी दुकानदारांना भाड्याने दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती. गाड्या धुण्याचे सर्विस सेंटर, लादी आणि टाईल्सचे दुकान आणि गॅरेजचे दुकान ह्या शिवसेना शाखेच्या भोवती सुरू होती. त्यामुळे तेथील नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या घेऊन यायला जमत नव्हते. ही बाब मुंब्र्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि सध्या मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक असणारे राजन किणे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर किणे यांच्या नेतृत्वाखाली ४० ते ५० जणांच्या जमावाने शाखेत घुसून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला बाहेर काढले. त्यानंतर शाखेवरील बोर्ड काढून शिंदे गटाचा बोर्ड लावून शाखेत प्रवेश मिळवत कब्जा केला. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या शाखेवर रात्री बुलडोझर लावून तोडून टाकली. तेथेच या नव्या शिवसेना मध्यवर्ती शाखेचे भूमिपूजन दशरथ पाटील शिवसेना उपनेते यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपाळ लांडगे (कल्याण जिल्हा प्रमुख) यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी नेत्या लता पाटील, नगरसेवक राजन किणे, नगरसेविका अनिता किणे, युवा नगरसेवक मोरेश्वर किणे, युवा नेतृत्व करण किणे, मुंब्रा शहर प्रमुख मुबिन सुर्वे, मुंब्रा शहर संघटक सुरेंद्र ढोमसे, विभाग प्रमुख महेश किणे, विभाग प्रमुख प्रविण शिंदे, शाखाप्रमुख विनोद पुकाळे, शाखाप्रमुख संदीप राठोड, शाखा प्रमुख रमेश किणे, शाखाप्रमुख मोहम्मद मोमीन, कळवा मुंब्रा प्रवक्ता आरिफ हसमी उपस्थित होते.
आनंद दिघे यांच्या काळात ही शाखा रस्ता रुंदीकरणात तोडल्यानंतर या आताच्या ठिकाणी आमच्या सहकार्याने बनवली गेली होती. मात्र आता याची दुरवस्था झालेली आम्हाला बघवली नाही. वर्षातून काहीच दिवस शाखा उघडण्यात येत होती. त्यामुळे ही शाखा धूळ खात पडली होती. मात्र शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी घोषित झाल्याने आम्ही आमच्या हक्काच्या शाखेत प्रवेश केला असल्याचं शिंदे गटाचे राजन किणे यांनी त्यावेळी स्पष्ट केलं. जुनी दुरवस्था झालेली शाखा पाडून आता त्या ठिकाणी नव्या पद्धतीने शिंदे गटाची शिवसेना शाखा बांधून स्थापन करण्यात येणार असल्याचे शिंदे गटाचे समर्थक माजी नगरसेवक राजन किणे यांनी सांगितले.


