२० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जरांगे -पाटलांची तोफ धडाडणार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मनोज जरांगे- पाटील यांची जाहीर सभा कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात २० नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पहिल्यांदाच जरांगे- पाटील यांची सभा होणार असल्याने या सभेत मनोज जरांगे -पाटील काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मनोज जरांगे -पाटील यांच्या सभेच्या निमित्ताने कल्याण मधील शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस, आम आदमी पक्षातील मराठा नेते एकत्र दिसतील.
मराठा समाजाच्या आरक्षणचा लढा देणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील येत्या सोमवारी कल्याणमध्ये येणार आहेत. मराठा समाजाच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार आहे. कल्याणमधील मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने या दौऱ्याचे आयोजन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील यांना कल्याणमध्ये आणण्याचे प्रयत्न मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यभर दौरा करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांची कल्याणमध्ये जाहीर सभा होणार आहे.
सभेला होणारी गर्दी लक्षात घेता मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत जागांची चाचपणी सुरू केली आहे. कल्याण पूर्वेकडील पोटे मैदान या जागांची चाचपणी सुरू आहे. याबाबत बोलताना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी अरविंद मोरे यांनी वीस तारखेला जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. कोळशेवाडी मधील पोटे मैदान हे सभेसाठी जवळपास निश्चित करण्यात आलेय. संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या सभेसाठी येणार असल्याचे सांगितले.
