मुंबई: मुंबई मेट्रो ३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोचे काम संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गिकेचा कफ परेड ते नेव्ही नगर असा विस्तार करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल काँर्पोरेशनने घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून काम पूर्ण होण्यास पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०३०-३१ मध्ये मुंबईकरांना आरे ते नेव्ही नगर असा थेट प्रवास करता येणार आहे.
मेट्रो ३ मार्गिकेच्या ३३ किमीच्या कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली होती. या मार्गावर एकूण २७ मेट्रो स्थानके आहेत. आता मेट्रो ३ चा कफ परेडपासून नेव्हीनगरपर्यंत २.५ किमीने विस्तार होणार असून या दरम्यान एकमेव नेव्ही नगर मेट्रो स्थानक असणार आहे. लवकरच या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर २०२५ मध्ये या विस्तारीत मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे.
मुंबई मेट्रो ३ हा मेट्रोचा पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्यातील भुयारीकरण पूर्ण झाले आहे. मार्गावरील स्थानकांची कामेही जवळपास ९८ टक्के पूर्ण झाली असून चार स्थानके जवळपास सज्ज झाले आहेत.
कफ परेड ते नेव्ही नगर अशा विस्तारीत मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल नुकताच पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी एका मुलाखतीत दिली आहे. टाटा इन्स्टिट्युट आँफ फंडामेन्टल रिसर्च (टीआयएफआर) जवळ हे स्थानक असणार आहे. या विस्तारीत मार्गिकेसाठी अंदाजे २५०० कोटींचा निधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)