आत्महत्येचा केला प्रयत्न
डोंबिवली ( शंकर जाधव ) : एका व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षीय मुलासह पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना शुक्रवारी कल्याण पश्चिमेकडील रामबाग लेन नंबर तीन येथील ओम दीपावली इमारतीत घटना घडली. व्यावसायिकाने स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकाने आपल्या पत्नीची व मुलाची हत्या का केली ? हे दीपकच्या अटकेनंतर उघड होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक गायकवाड असे व्यावसायिकाचे नाव आहे. त्याचे कल्याण शहरात नानूज वर्ल्ड नावाने खेळण्याचे दुकान आहे. दीपक गायकवाड हा त्याची पत्नी अश्वीनी आणि सात वर्षाचा मुलगा आदिराज याच्यासोबत राहतो. शुक्रवारी दुपारी त्याने त्याच्या नातेवाईकाला फोन करून पत्नी आणि मुलाची हत्या केल्याचे सांगितले. तसेच स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. घाबरलेले नातवाईक दीपकच्या घरी गेले असता जमिनीवर आश्विनी व सात वर्षाचा मुलगा आदिराजचा मृतदेह दिसून आला. हत्या करून दीपक पसार झाला होता. नातेवाईकांनी या घटनेची माहिती महात्मा फुले पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलगा आणि त्याच्या आईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. हत्या करणाऱ्या दीपकचा पोलीस कसून शोध घेत आहेत.