मुंबई, : पुर्वोत्तर भारताचे इतर प्रदेशांसोबतचे संबंध दृढ करणारी संस्था असा नावलौकिक मिळवलेली ‘माय होम इंडिया’द्वारे ईशान्य भारतासाठी कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा दरवर्षी 'वन इंडिया अवॉर्ड'ने सन्मान केला जातो. सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या हस्ते यावर्षीचा हा पुरस्कार मिझोरामच्या वीरमाता समाजसेविका वेनमावी यांना प्रदान करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांची संकप्लना असलेल्या या पुरस्काराचे यंदा १३ वे वर्ष होते. हा पुरस्कार सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात पार पडला. वन इंडिया पुरस्काराने वेनमावी यांचा सन्मान केल्याने या पुरस्काराचाच गौरव वाढला असल्याचे सुनिल देवधर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आपल्या भाषणातून “वेनमावी यांच्यासारख्या प्रखर देशभक्तांचा मोठ्या प्रमाणात सत्कार होणे गरजेचे आहे” असे उद्गार माननीय राज्यपालांनी काढले. ते पुढे म्हणाले की, आता पूर्वोत्तर भारतात देखील अनेक जण विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवत आहेत आणि इतरांसाठी प्रेरणा देत आहेत.
प्रमुख वक्ता म्हणून बोलत असताना, सुनिल देवधर म्हणाले की, "पुर्वी मोठे मोठे पुरस्कार राजकारण्यांच्या शिफारसींवर दिले जायचे, परंतु आता मोदी जींच्या काळात योग्य माणसाला पुरस्कार देऊन समाजाला दिशा व प्रोत्साहन देण्याचे कार्य देशभर घडताना दिसते आहे." वेनमावी यांचा त्याग व देशासाठीची समर्पणाची भावना अतुलनीय आहे. त्यांनी आपला एक पुत्र देशासाठी हुतात्मा झाला असताना देखील, दुसऱ्या मुलाला सैन्यात भरती केले. धन्य ती माता !
वेनमावी यांनी आपल्या भाषणातुन त्या कटू क्षणांचा उल्लेख केला, जेव्हा त्यांनी आपल्या मुलाचे तिरंग्यामध्ये गुंडाळलेलं शव स्वतः पाहिले व ठरवले की आपल्या दुसऱ्या मुलाने देखील सैन्यात भरती होऊन देशसेवा केली पाहिजे. या पुरस्कार सोहळ्याला चाणक्य मंडळचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी, माय होम इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीश शेट्टी, व्यावसायिक अजित मराठे, श्रीराम दांडेकर, संस्थेचे मॅनेजींग ट्रस्टी श्रवण झा, विनय पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
