डोंबिवली ( शंकर जाधव ) : ध्रुही राजेश पाटील या विद्यार्थिनीने धरमतर (अलिबाग) ते गेटवे ऑफ इंडिया असे ३६ किमीचे सागरी जलतरण अंतर ९ तास २३ मिनिटात पार करण्याची कामगिरी नुकतीच केली.
ध्रुही पाटील इरा ग्लोबल स्कूल मध्ये शिकते. ध्रुही पाटील हिने धरमतर (अलिबाग) ते गेटवे ऑफ इंडिया असे अंतर ८ तासात पोहून पार करण्याचा निर्धार केला होता.परंतु कासा खडकच्या पुढे सकाळी १० वाजता अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे ध्रुहीला वाऱ्यामुळे समुद्रात उसळणाऱ्या लाटांचा मारा सहन करीत पुढे गेटवे पर्यंत पोहून जावे लागले.त्यामुळे तिला निर्धारित वेळेत अंतर कापण्यात अडचणी आल्या.
ध्रुही पाटील हिने मालवण,विजयदुर्ग,मुंबई, येथे राज्य स्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. २० ऑक्टोंबर रोजी एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया १२ किलोमीटर सागरी जलतरण अंतर ३ तास ३० मिनिटात पोहून पार केले.जिल्हा स्तरीय स्पर्धेत सुद्धा उत्तम कामगिरी केली आहे.ध्रुहीने १८ डिसेंबर रोजी पहाटे अंगाला ग्रीस लावून समुद्राची पूजा करून ३ वाजून २६ मिनिटांनी महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील पाटील यांच्या निरीक्षणाखाली धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया सागरी अंतर पोहण्यास सुरवात केली.
ध्रुही पाटील हिला महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटना व ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तसेच यश जिमखाना स्टाफ व प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले.त्यामुळे ती हे अंतर यशस्वीरीत्या पार करू शकली.गेटवे ऑफ इंडिया ला पोहचल्यावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. ३६ किमी न थांबता पोहल्यामुळे तीच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.ध्रुही चे प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली यश जिमखाना मध्ये दररोज ८ ते ९ तास प्रॅक्टीस करत होती तिची मेहनत व जिद्द पाहून यश जिमखाना मालक राजू वडनेरकर साहेबांनी तिला स्विमिंग पूल उपलब्ध करून या मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच महिन्यातून २ ते ३ वेळा उरण ला संतोष पाटील यांच्याकडे समुद्रात सराव करून घेतला. तिने बाहेर देशातील इंग्लिश खाडी पोहण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली.
