ठाणे : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे यांच्यात शिवसेना शाखा कोणाची यावरून अनेक वाद निर्माण झाले. शिंदे गटाने पदाचा आणि बळाचा वापर करत प्रत्येक शाखा बळकावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे खऱ्या सामान्य जनतेच्या शाखेला टाळे लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. ठाण्यातील शिवाई नगरमधील खरी शिवसेना बंद झाल्यानंतर आता शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पदपथावर कंटेनर आणून त्याला शाखेचे रूप दिले आहे. या कंटेनरचा स्थानिकांना त्रास होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे पदपथावर उभारलेल्या कंटेनर शाखांवर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्याला शिंदे गटाने प्रतिउत्तर देत कंटेनर शाखा व्यावसायिक वापरासाठी नव्हे तर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उभारल्याचे म्हटले आहे. यामुळे कंटेनर शाखांवरून आता दोन्ही गटातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
ठाण्यातील मनोरमानगर आणि शिवाईनगर परिसरात असे प्रकार घडल्याचे दिसून आले. काही दिवसांपूर्वीच मुंब्र्यातील वादग्रस्त शाखेचा वाद टोकाला पोहोचल्याने शिंदे गटाच्या राजन किणे यांनी या ठिकाणी शाखेच्या पुनर्बांधणीचे काम होईपर्यंत कंटेनर शाखा रस्त्याच्या कडेला सुरू केली आहे. या वादात पालिका प्रशासनाने चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला. या कंटेनर शाखेवर पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसताना शिवाईनगर येथील मुख्य चौकात टीएमटी बस थांब्याशेजारीच शिंदे गटाने ९ नोव्हेंबर रोजी नवीन शाखेचे उद्घाटन केले. पदपथावरच आठ फूट रुंद व चौदा फूट लांब ही शाखा असल्याने पादचाऱ्यांना अशा शाखांचा त्रास होत असतानाच शिवसेना ठाकरे गटाने या विरोधात भूमिका मांडल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
मीरा - भाईंदरमध्ये कंटेनर शाखेवर चोरीची वीज
मीरा - भाईंदर शहरात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या शिवसेनेच्या( शिंदे गट )कंटेनर शाखेने चोरी केलेली वीज सलग दुसऱ्यांदा अदानी वीज समूहाकडून खंडित करण्यात आली आहे. मात्र या संदर्भात अद्यापही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मीरा-भाईंदर शहरात शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाने बेकायदेशीरपणे रस्त्यावर कंटेनर शाखा उभारल्या आहेत. या शाखांना कोणतीही शासकीय परवानगी नसल्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ( उद्धव गट ) आणि काँग्रेस पक्षाने महापालिकेकडे केली आहे. याशिवाय या शाखांना मिळालेला वीज पुरवठा खंडित करण्यासाठी अदानी वीज समूहाकडे पाठपुरावा केला जात होता.