नवी मुंबईत 'विकसित भारत संकल्प यात्रे’ला सुरुवात

नवी मुंबई: १५ नोव्हेंबरपासून देशभरात सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शुभारंभ महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १८ जानेवारीपर्यंत ४५ ठिकाणी २३ दिवस ही यात्रा ठिकठिकाणी जाऊन लाभार्थ्यांना केवळ योजनांची माहिती देणार नाही तर त्यापुढे जात प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करेल असे सांगत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या योजनांचा लाभ पात्र नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा व सर्व संबंधित विभागांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

 सरकार राबवित असलेल्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घेता यावा याकरिता लाभार्थ्यांनी सरकारी कार्यालयात येण्याऐवजी सरकारनेच लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित केली जात आहे.  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ २७ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत राबविली जात असून प्रत्येक दिवशी सकाळी १०.०० ते ०१.०० आणि दुपारी ०३.०० ते ०६.०० अशा दोन सत्रात ही यात्रा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात २३ दिवसात ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे.

 याप्रसंगी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, परिमंडळ उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार व सोमनाथ पोटरे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, माजी महापौर  सागर नाईक, माजी नगरसेवक नविन गवते, डॉ. जयाजी नाथ, रामचंद्र घरत, शंकर मोरे, अशोक पाटील, रमेश डोळे, ॲड. अपर्णा गवते, दीपा गवते, माधुरी सुतार आणि इतर लोकप्रतिनिधी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी आयुक्तांनी यात्रेच्या माहिती प्रचार रथाला हिरवा झेंडा दाखवून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील यात्रेचा शुभारंभ केला. केंद्र सरकारने शहरी भागासाठी १५ विविध प्रकारच्या योजना आखून दिल्या असून त्याविषयीची माहिती वाहनावर लावलेल्या एलईडी स्क्रीनवरुन कार्यक्रम स्थळी प्रसारित केली जात आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार, राज्य शासन तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या लोककल्याणकारी विविध योजना व उपक्रम यांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले असून तेथे योजनांशी संबधित अधिकारी, कर्मचारी योजनांविषयीची माहिती देतील तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज दाखल करण्यास संपूर्ण सहकार्य करतील. त्यामुळे या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहचतील व पात्र नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल असे आयुक्तांनी सांगितले.

सरकारच्या योजना या मोबाईल मधील ॲपवर असून ॲपवर माहिती भरुन योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सहजशक्य आहे. तथापि नागरिकांकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये ॲपदेखील आहे, मात्र ते वापरण्याचे ज्ञान नाही, ही परिस्थिती बदलण्याची गरज व्यक्त करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्यासाठी व जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने अधिक प्रभावीपणे प्रयत्न केला जाईल असे सांगितले. याकामी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे यांचीही मदत घेतली जाईल असे ते म्हणाले. यावेळी आयुक्त महोदयांसमवेत सर्व उपस्थितांनी ‘आपला संकल्प - विकसित भारत’ ही सामूहिक शपथ ग्रहण केली.

यावेळी बोलतांना माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनी लोककल्याणकारी योजनांच्या विकासाची गंगा समाजाच्या शेवटच्या लाभार्थी घटकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून राबविली जात असून त्याची माहिती व्यापक प्रमाणात सर्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावेत व या कामामध्ये सर्व घटकांचे सहकार्य घ्यावे असे सांगितले. यात्रेमध्ये दाखविल्या जाणा-या पंतप्रधान महोदयांच्या संदेश चित्रफितीत नवी मुंबईच्या अनेक स्थळांचे व लाभार्थ्यांचे दर्शन घडते ही आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. या यात्रेच्या माध्यमातून सर्वांना आवश्यक लाभ मिळवून देत एकमेकांशी जोडण्याचे काम होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती व त्याचा लाभ प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध स्टॉल उभारण्यात आले असून पीएम स्वनिधी योजना, स्वनिधी  से समृद्धी योजना, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम मुद्रा लोन, स्वच्छ भारत अभियान, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, खेलो इंडिया, पीएमई बस सेवा, आरोग्य तपासणी अशा विविध योजनांच्या स्टॉलचा समावेश आहे.




Post a Comment

Previous Post Next Post