माउंट मेरीचा पराभव करत वसंत विहार विजयी

इंटरस्कूल थ्रोबॉल चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धा

 मुंबई: मुंबई स्कूल स्पोर्ट असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या इंटरस्कूल थ्रोबॉल चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत १२ वर्षांखालील, १४ ( मुली) आणि १६ वर्षांखालील वसंत विहार शाळेच्या (ठाणे) खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जेतेपद पटकाविले. तर वसंत विहारच्याच १४ वर्षांखालील मुलांना १६ वर्षांखालील मुलींना दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.या स्पर्धा माटुगा येथे खेळविण्यात आली होती.

 १६ वर्षाखालील इंटरस्कूल थ्रोबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना वसंत विहार हायस्कूल आणि माउंट मेरी हायस्कूल यांच्यात झाला. दोन्ही संघांनी आपआपल्या उपांत्य सामन्यात शानदार खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात माउंट मेरी हायस्कूलने नाणेफेक जिंकून आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. मात्र वसंत विहार हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट बचाव करत पहिला डाव २१ -१५ ने जिंकून स्पर्धेत आघाडी घेतली. जेतेपद पटकाविण्याच्या उद्देशानेच कोर्टवर उतरलेल्या वसंत विहारच्या खेळाडूंना दुसरा डाव जिंकणे सोपे नव्हते. माउंट मेरीच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि बचावात्मक खेळ करत वसंत विहारच्या खेळाडूंना चांगली झुंज दिली. सुरुवातीला गुणांची संख्या वाढवत माउंट मेरीच्या खेळाडूंनी चांगला दबाव निर्माण केला होता. मात्र माउंट मेरीच्या खेळाडूंच्या आक्रमक खेळाला रोखत वसंत विहारच्या खेळाडूंनी चांगले पुनरागमन केले. शेवटच्या वेळेत कर्णधाराने केलेल्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर माउंट मेरीचा २१-१७ ने पराभव करण्यात वसंत विहारला यश आले. वसंत विहारने दोन डावात २१-१५ आणि २१ -१७ ने जेतेपद पटकाविले.

उपांत्य फेरीच्या सामन्यात वसंत विहार विरुद्ध गोकुळधाम असा सामना रंगला. गोकुळधाम हायस्कूलच्या खेळाडूंनी नाणेफेक जिंकून सामन्याच्या सुरुवातीपासूनच बचावात्मक खेळ करत वसंत विहारवर दबाव निर्माण केला आणि पहिला डाव २१-१७ ने जिंकून वसंत विहारला चांगलाच दणका दिला. दुसर्‍या डावात शानदार पुनरागमन करत वसंत विहारने २१-१७ ने बाजी मारत बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात दोन्ही संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाने एकमेकांना कडवी झुंज दिली. वसंत विहारच्या खेळाडूंनी विजय संपादन करण्यासाठी सुरुवातीला १२ गुणांनी आघाडी मिळवली होती.  मॅच पॉइंट वसंत विहारच्या बाजूने असताना कर्णधाराने अंतिम पॉइंट आपल्या खिशात टाकत वसंत विहारला २१-१९ ने विजय मिळवून देत आपले अंतिम फेरीत प्रवेश केला.

प्रशिक्षका पूजा दहिवलकर आणि दीपक कोटियन तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन गावडे आणि प्राचार्य गीता नायर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post