राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
मुंबई : जगभरातील लोक भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. महिलांच्या अधिकारासाठी कार्य केले आणि महिलांना सन्मान मिळवून दिला. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी राज्यपाल बैस बोलत होते.
राज्यपाल बैस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान शिक्षणतज्ज्ञ होते, शोषितवर्गाचे शिक्षण झाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. मागास, वंचित, बहुजनांना शिक्षण मिळण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्थांच्या माध्यमातून आजही काम सुरू आहे. महिलांच्या अधिकारासाठी कार्य केले आणि महिलांना सन्मान मिळवून दिला. इंदू मिल येथील निर्माणाधीन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण होईल, याचा मला विश्वास असल्याचेही राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितले.