कल्याण, (शंकर जाधव) : नौसेनिकांच्या ड्रेसवर शिवाजी महाराजांची मुद्रा ही कल्याणकरांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक अभिमन्यु गायकवाड, अनिरुद्ध जाधव, आशीष पावसकर, संतोष होळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि ज्या कल्याणमध्ये आरमाराची स्थापना केली. त्या आरमाराचे महत्व त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होते. समुद्रामार्गे होणारा कुठलाही हल्ला असो किंवा समुद्र व्यापार ज्याचे आरमार त्याचे समुद्रावर वर्चस्व.
गेल्या ७० वर्षात कुठल्याही राजकारण्याने नौसेनेच्या झेंड्यावरील गुलामगिरीच्या चिन्हाबाबत लक्ष दिले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी नौसेनेच्या दिनाच्या दिवशी नौसेनेच्या झेंड्यावरील गुलामगिरीचे चिन्ह काढून टाकत छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा टाकली होती. यंदाच्या नौसेना दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग दौऱ्यात नौसैनिकांच्या ड्रेसवर शिवाजी महाराजांचीमुद्रा टाकल्याने आपल्या दृष्टीकोनातून कल्याणात छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारची सुरवात केली असल्याने ही बाब अभिमानास्पद असल्याचे जिल्हाअध्यक्ष सूर्यवंशी यांनी सांगितले.