दिवा शीळच्या खाडीकिनारी टाकलेल्या कचऱ्याला लागताहेत आगी

 


  • कचऱ्याच्या धूरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
  • प्रशासन आगीकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप

दिवा, ( आरती मुळीक परब) :  शीळ- दिवा मार्गावर असलेल्या खाडी किनारी पूलाजवळ टाकल्या गेलेल्या कचऱ्याला आगी लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परवा संध्याकाळपासून कचऱ्याला लागलेली आग अग्निशामन केंद्राकडून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता विझवण्यात आली. त्यामुळे दिवा, मुंब्र्यात आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात त्या भागात दोन ते तीन वेळा आगी लागल्या आहेत. 

दिव्यात डंपिंग जरी बंद झाले तरी दिवा शीळ रस्त्याच्या खाडी किनारी अनधिकृतरित्या कचरा टाकून तेथे डंपिंग उभ राहत आहे. तेथे साचलेल्या कचऱ्याचे विघटन होऊन गॅस तयार होऊन उन्हामुळे कचऱ्याला आग लागत आहे. त्यामुळे ह्या खाडी किनारी कचऱ्याच्या धुराचे आवरण पसरलेले असते. दोन दिवसांपूर्वी कचऱ्याला लागलेल्या आगीची माहीती सहाय्यक आयुक्त, प्रदूषण मंडळ यांना जागरुक नागरिकांनी तात्काळ व्हाट्सअप द्वारे व्हिडिओ पाठवली तरीसुद्धा दुपारच्या दोन पर्यंतही अग्निशमन दलाची गाडी आग विझवण्यासाठी आली नव्हती. ती गाडी सर्वत्र कचऱ्याच्या धुराचे लोट पसरून नागरिकांना श्वासास त्रास सुरू झाल्यावर संध्याकाळी सहा वाजता अग्निशमन दलाची गाडी येऊन आग विझवण्यात आली. 

दिवा, मुंब्रा शहरामध्ये या कचऱ्याच्या आगीचा धूर पसरल्यामुळे हवेच्या प्रदूषणात अजून भर पडत आहे. या धुरामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. यामुळे सर्दी, खोकला, घशाला जळजळ, डोळ्यांची आग, असे रोग नागरिकांना होण्याची शक्यता आहे. या धुरामुळे वातावरणातील ओझोन वायू ही नष्ट होत आहे. रोजच्या रोज दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांच्या या मार्गातून गाड्या जाऊन सुद्धा त्यांच्या नजरेत या कचऱ्याच्या आगीचा धूर पडत नसेल का ? तरीही जाणून बुजून प्रशासन दिसून न दिसल्या सारखे करत आहेत. दिव्यातील, मुंब्र्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रशासन आता तरी पावले उचलणार का? असे प्रश्न जागरूक नागरिक विचारत आहेत.

रोशन भोईर, रिक्षा चालक, खर्डी - रोजच्या रोज खाडी किनारी टाकलेल्या कचऱ्याला आग लागल्याने श्वासाच्या समस्या वाढल्या. आम्हा रिक्षा चालकांना ही नेहमी तोंडाला रुमाल बांधावा लागतो. या धुरामुळे डोळ्यांचे ही आजार वाढले आहेत. पालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाचे अधिकारी देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post