अलिबाग वडखळ मार्गावर अपघात

  • काही काळ वाहतूक ठप्प
  • वाहतूक परहूर- कनकेश्वर फाटा मार्गे वळवली

अलिबाग (धनंजय कवठेकर) : अलिबाग वडखळ मार्गावर गेल्या काही दिवसांपासून अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा फटका अलिबागकरांना सहन करावा लागत आहे. उसर येथील गेल कंपनीच्या विस्तारीकरण कामामुळे अवजड साहित्यांची वाहतूक वडखळ अलिबाग मार्गाने उसरकडे होत आहे. मात्र ही अवजड वाहने कोणत्या ना कोणत्या कारणाने बंद अथवा अपघातग्रस्त होत आहेत. याचा नाहक त्रास अलिबाग, मुरूडकडे जाणाऱ्या प्रवासी, पर्यटक व वाहनचालकांना होत आहे.

     सोमवारी दुपारच्या सुमारास वडखळ बाजूकडून अलिबाग, उसरकडे अवजड साहित्य घेऊन जाणारा ट्रेलर क्रमांक एम.एच. ४६ बी.एफ. ६७९४ हा कार्लेखिंड येथील चढावरून अलिबागकडे पहिल्याच अवघड वळणावरून जात असताना अवजड साहित्य घेऊन जाणारा ट्रेलर चढाव चढताना अपघात होऊन तो रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. याच दरम्यान या अवजड वाहनाची धडक रिक्षा, टेम्पोला बसल्याने अपघात झाला, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

           यावेळी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या मार्गावरील वाहतूक कार्लेखिंड- परहूर पाडा- कनकेश्वर फाटा मार्गे वळवली. यामुळे अलिबाग वडखळ मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी अलिबाग रेवस मार्गावर व कनकेश्वर फाटा पासून ते कार्लेखिंड मार्गावर वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी झाली होती. 

       संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास वाहतूक पोलिसांना आपल्या टोव्हिंग व्हॅनच्या साहाय्याने सदर अपघातग्रस्त अवजड वाहन व टेम्पोला बाजूला करण्यात यश आले. यानंतर अलिबाग वडखळ मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू झाली. अशा अवजड वाहनांना ठराविक वेळेतच वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशी व वाहनचालकांना नाहक मनःस्ताप होणार नाही. अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांनी केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post