१८ बेवारस वाहनांवर कारवाई
ठाणे, : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाण्यात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी ठाणे महापालिका मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली असून आयुक्तांनी दर शनिवारी एक प्रभाग अशा पध्दतीने नियोजन केले आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने नौपाडा-कोपरी क्षेत्रातील रस्त्यावरील बेवारस वाहने तसेच अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शनिवार, १३ जानेवारीपासून नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने नौपाडा-कोपरी क्षेत्रातील रस्त्यावरील बेवारस वाहने हटविण्यात येत आहेत. त्यात, नारायण कोळी चौक, चेंदणी कोळीवाडा, बारा बंगला, कोपरी कॉलनी येथील १३ बेवारस-भंगार वाहने उचलून बाटा कंपाऊंड येथे नेण्यात आली. तसेच, परबवाडी, मेंटल हॉस्पिटल, सिव्हिल रुग्णालयाच्या मागे, व बंजारा वस्ती परिसर या भागातून पाच बेवारस वाहने आणि १८ टपऱ्या हटविण्यात आल्या. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार, परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.
