डोंबिवलीत भव्य कोकण महोत्सवाला सुरुवात

 

कोकणातील पंरपरा, कलासंस्कृतीचे दर्शन 

'लालपरी सेल्फी पॉईंट'मुख्य आकर्षण 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : लोकसेवा समिती डोंबिवलीच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त पूर्वेकडील चिनार मैदानात भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले.महोत्सवात कोकणातील परंपरा आणि कलासंस्कृतीचे दर्शन होईल असे अध्यक्ष रामचंद्र ( बाळा ) पवार यांनी सांगितले.या महोत्सवात कोकणची लालपरी असलेल्या एसटीतून प्रवास असा सेल्फी पॉईंट हे मुख्य आकर्षण आहे.

  महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी माजी महापौर विनिता राणे, अध्यक्ष पवार, चिटणीस विजय साईल, आत्माराम नाटेकर, विष्णू सकपाळ, चारुदत्त राणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शनिवार ६ जानेवारी रोजी श्री दुर्गादेवी पारंपरिक नाट्य मंडळ ( कुणकवळे), रविवार ७ जानेवारी रोजी श्री विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ ( वाडा, ता.देवगड) विरुद्ध विठ्ठल -रखुमाई प्रासादिक भजन मंडळ ( देवीचा पाडा, बोरिवली ) , सोमवार ८ रोजी सिंधुदुर्ग दशावतार नाट्य मंडळ यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग अर्ध पुरुषी नारी, मंगळवार ९ तारखेला तुळजाभवानी प्रासादिक पारंपरिक वारकरी दिंडी ( त्रिंबक, ता.मालवण ) , बुधवार १० जानेवारी हरिओम प्रासादिक भजन मंडळ, डोंबिवली विरुद्ध श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ ( कोपर ) विरुद्ध श्री देव वेताळ रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ ( डोंबिवली ), गुरुवार ११ तारखेला सखी फुगडी संघ ( पावशी ) ता.,कुडाळ, जि.सिंधुदुर्ग यांचे पारंपरिक फुगडी नृत्य , शुक्रवार १२ तारखेला श्री गणेश कृपा लोकनाट्य मंडळ ( गोळवली) ता. संगमेश्वर यांचे पारंपरिक नमन आणि शनिवार १३ तारखेला सायंकाळी ६ वाजता लोकसेवा कलाविष्कार याचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवात कोकणातील विविध उत्पादनेही आहेत.दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कलासंस्कृतीचे दर्शन घडणार असून डोंबिवलीकरांनी याचा लाभ घ्यावा असे अध्यक्ष पवार यांनी यावेळी सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post