जपानमधील भूकंपात ४८ जण ठार


वाजिमा, (जपान):  नवीन वर्षाच्या दिवशी जपानला शक्तिशाली भूकंपाचा सामना करावा लागला. यामध्ये आतापर्यंत किमान ४८ जण ठार झाले आहेत. यामुळे वाजिमा येथे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.मंगळवारी सगळीकडे, कोसळलेल्या इमारतींचा ढिगारा, रस्ते उद्ध्वस्त, वीज वाहिन्या खंडित असल्यामुळे बचाव पथकांना एकाकी भागात पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
 त्सुनामीच्या लाटा जपानच्या पश्चिम समुद्रकिनारी आदळल्याने, गाड्या आणि घरे पाण्यात वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 सोमवारी दुपारी ७.६ च्या प्राथमिक तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवरील नागरिकांनी उंच ठिकाणी आसरा घेतला आहे. इशिकावा प्रांतातील नोटो द्वीपकल्पातील भूकंपाच्या ठिकाणी लष्कराचे कर्मचारी, अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी असा ३००० जणांचे बचाव पथक पाठवण्यात आला आहे.
मंगळवारी पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी स्वतः आपत्ती निवारण कार्यादरम्यान अधिकाऱ्यांसोबत निळा पोशाख घालून सहभाग घेतला, त्यावेळी त्यांनी भूकंपामुळे प्रभावित झालेल्यांचा शोध आणि बचाव करण्याची मोहीम सुरू असून ही सध्याच्या काळाविरुद्धची लढाई असल्याचे सांगितले.  

 किशिदा म्हणाले उकी नोटो प्रायद्वीपच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचणे बचावकर्त्यांना खूप कठीण जात आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात अनेक आगी आणि इमारती आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. एका सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार 
सुमारे१२० लोक बचावाच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते.  या भागातील अनेक रेल्वे सेवा आणि उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. नोटोच्या विमानतळाच्या धावपट्टीमध्ये आणि प्रवेशाच्या रस्त्याला तडे गेल्यामुळे आणि टर्मिनल इमारतीला झालेल्या नुकसानीमुळे 
५०० हून अधिक लोक अडकले आहेत.

 सुझू येथील भूकंपाच्या केंद्राजवळील किनारपट्टीला लागून सुमारे 
 ५००० हून अधिक घरे आहेत, त्यातील १००० घरे उद्ध्वस्त झाली असतील असे महापौर मासुहिरो इझुमिया यांनी सांगितले.





Post a Comment

Previous Post Next Post