सिडनी: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू डेविड वॉर्नर (David Warner) याने त्याच्या अंतिम कसोटी सामन्यापूर्वी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. ३७ वर्षीय खेळाडूने यापूर्वी पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकतो असे महत्त्वाचे संकेत देखील त्याने दिले आहेत.
सोमवारी, वॉर्नरने विश्वचषकात अत्यंत आश्चर्यकारकरित्या विश्वचषक जिंकलो, त्यामुळे हीच योग्य वेळ आहे, निवृत्त होण्याची जेणेकरून नवीन खेळाडूंसाठी संधी निर्माण होतील आणि त्याला परदेशात फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यावर त्याला अधिक लक्ष देता येईल असेही त्याने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया संघ ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यानंतर वॉर्नर या फॉरमॅटला अलविदा करणार आहे. त्यानंतर त्याने त्याच दिवशी एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयावर चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डेविड वॉर्नर म्हणाला, कसोटी आणि वनडेतून निवृत्ती घेतल्यानंतर मी जगभरातील काही टी-२० लीगमध्ये खेळणार असल्याचे संकेत वॉर्नरने दिले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ आली आहे हे मला माहीत आहे. मी दोन वर्षात चांगले क्रिकेट खेळत असेल आणि ऑस्ट्रेलियन संघाला माझी गरज असेल तर मी उपलब्ध असेल, असे ही वॉर्नरने सांगितले.
डेविड वॉर्नरने १६१ एकदिवसीय आणि १११ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. डेविड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४५.३० सरासरीने आणि ९७.२६ स्ट्राईक रेटने ६ हजार ९३२ धावा केल्या. ज्यात २२ शतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ४४.५८ च्या सरासरीने ८ हजार ६९५ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये डेविड वॉर्नरने २६ शतक झळकावली आहेत. डेविड वॉर्नरचा दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघात समावेश होता.