पुणे : कोरेगाव भीमा या ठिकाणी सोमवारी २०६ वा शौर्य दिन साजरा होत आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले. मंत्री चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड हे नेतेही कोरेगाव भीमा या ठिकाणी येणार आहेत. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झालेल्या कोरेगावच्या लढाईचा दिवस अनुयायांकडून शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो.
नववर्षाचा पहिला दिवस आणि शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला लाखो आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी अभिवादन केले. विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पंचक्रोशीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणांहून अनुयायी आले आहेत. युवकांनी पुण्यापासून दुचाकी फेरी काढून भीमा कोरेगाव गाठले. प्रवासातील गावांमध्ये नागरिकांनी अभिवादनास येणाऱ्या अनुयायांना न्याहरी तसेच चहा देऊन पुढील मार्गक्रमण करण्यासाठी ताजेतवाने केले.
विजयस्तंभ परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून आतषबाजी तसेच सामुदायिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजयस्तंभास अभिवादन केले. समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
पहाटेपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. २०६ वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा इथे झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. १ जानेवारी १९२७ ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
रविवारी रात्रीनंतर नगर रस्त्यावर वाहनबंदी करण्यात आली होती. अनुयायांसाठी २९ ठिकाणी आरोग्य बूथ उभारण्यात आले असून २० फिरते बाईक आरोग्य पथके, ५० रुग्णवाहिका, ९० तज्ज्ञ डॉक्टर्स आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच जवळच्या खासगी रुग्णालयात पुरेशा औषध साठ्यासह शंभर खाटाही आरक्षित करण्यात आल्या आहेत.
अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा आणि पेरणे परिसरात येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणत्याही सुविधा कमी पडणार नाहीत, याबाबतची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यावर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांबरोबरच बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासनाने वाढीव संख्येने जय्यत तयारी करण्यात आली आहे.