३६० वन वेल्थ अखिल भारतीय ग्रां प्री बुद्धिबळ सीरिज
मुंबई, : रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चर येथे आयोजित करण्यात आलेल्या ३६० वन वेल्थ अखिल भारतीय ग्रां प्री बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या राउंडमध्ये एलो १४५४ रेटिंग असलेल्या १५ वर्षीय कुश अग्रवालने आपल्यापेक्षा जास्त एलो रेटिंग असलेला दुसरा सीडेड राघव श्रीवास्तवला (एलो १९८०) बरोबरीत रोखले.
इंडियन चेस स्कूलद्वारे आयोजित स्पर्धेत पांढर्या मोहर्यांनिशी खेळणार्या कुशने पिर्क/मॉर्डर्न बचावासह सुरुवात करणार्या राघवला तोडीसतोड प्रत्युत्तर दिले. सुरुवातीच्या आक्रमण आणि प्रतिआक्रमणासह डावाच्या मध्यावर प्रचंड चुरस निर्माण झाली. राघवने सोंगट्यांची अदलाबदल करून दडपण थोडे कमी केले. त्याने राजाला पुढे करताना डावात पुनरागमन केले.मात्र, राघवने विजयासाठी प्रयत्न न करता डाव पुढे सुरूच ठेवला. दरम्यानच्या काळात कुशने प्रभावी चाल रचल्या. मात्र, ५६ चालीनंतर दोघांनीही बरोबरी मान्य केली.
दुसर्या बोर्डवर राज्याचा राष्ट्रीय हौशी बुद्धिबळ चॅम्पियन अमरदीप बारटक्के याने पांढर्या मोहर्यांनिशी खेळणार्या ईशान तेंडोलकरला केवळ ३९ चालींमध्ये पराभूत करून करून चौथ्या फेरीअखेर गुणसंख्या चारवर नेली. अर्णव कोळी, संजीव मिश्रा आणि यश कापडी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत प्रत्येकी चार गुण खात्यात जोडत अमरदीपसह गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.
साडेतीन गुणांसह पाच खेळाडू संयुक्तरित्या दुसर्या स्थानी आहेत. त्यात अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीसह राघव श्रीवास्तव, अर्णव खर्डेकर, अभिजित जोगळेकर आणि कुश अग्रवालचा समावेश आहे.
चौथ्या राउंडमधील प्रमुख निकाल:
कुश अग्रवाल (3.5 गुण) ड्रॉ राघव श्रीवास्तव (3.5 गुण)
अमरदीप बारटक्के (4) विजयी वि. ईशान तेंडोलकर (3)
दीपक सोनी (3) पराभूत वि. अर्णव कोळी (4)
संजीव मिश्रा (4) विजयी वि. श्रेयस कौशिक (3)
यश कापडी (4) विजयी वि. अमेय कडकडे (3)
विक्रमादित्य कुलकर्णी (3.5) विजयी वि. देवेश आंब्रे (2.5)
युती पटेल (2.5) पराभूत वि. अर्णव खर्डेकर (3.5)
एस. अग्रवाल (2.5) पराभूत वि. अभिजीत जोगळेकर (3.5)
सुनील वैद्य (3) विजयी वि. रेयांश व्यंकट (2.5)
मयन झा (2) पराभूत वि. सोहम पवार (3)