- पुष्प प्रदर्शनात ४५० विविध जातीतील गुलाब
- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इंडियन रोझ फेडरेशन या अखिल भारतीय गुलाबप्रेमींच्या संस्थेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आनंद बालभवन येथील डोंबिवली गुलाब पुष्प प्रदर्शन आणि स्पर्धेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात ४५० विविध जातीचे गुलाब ठेवण्यात आले आहेत.
या स्पर्धेत किंग म्हणून क्लास काॅर, क्वीन म्हणून पुई इटस, प्रिन्स म्हणून समोरन्स आणि प्रीन्सेस म्हणून चॅटेलीयन यांनी पारितोषिक मिळाले. डोंबिवलीकर गुलाबप्रेमीं या प्रदर्शनात उपस्थिती दर्शविली असून त्यांनी रंगेबिरंगी मोहक फुलांबरोबर सेल्फी काढले. महाराष्ट्रातील प्रमुख गुलाब लागवड करणाऱ्या नामांकित व्यक्तींना याठिकाणी बोलावण्यात येते. पुणे, वांगणी, शहापूर बरोबरच खास नागपूर आणि नाशिक येथील गुलाब उत्पादक आले होते.
विशेष म्हणजे राष्ट्रीय गुलाब प्रदर्शनातील पारितोषिक विजेते प्रमुख गुलाब उत्पादक वांगणीचे आशिष मोरे व चंद्रकांत मोरे तसेच सरळगावचे डॉ. विकास म्हसकर यांच्या बागेतील गुलाब खास आकर्षण ठरले. यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, डोंबिवलीत सुरु असलेल्या राज्यस्तरीय गुलाब पुष्प व स्पर्धेत सर्व फुल उत्पादन करणारी मंडळी आणि गुलाब प्रेमी आले आहेत. दरवर्षी प्रदर्शनात २५ ते ३० हजार गुलाबप्रेमी येत असतात.तर गुलाबप्रेमी डॉ.विकास म्हैसकर म्हणाले, गेली १४ वर्ष राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन भरवले जाते. राज्यातील विविध ठिकाणाहून गुलाबप्रेमी येत असतात.