‘स्टार प्लस’ वाहिनीवर ‘उडने की आशा’ नवी मालिका
प्रेक्षकांसमोर दर्जेदार मालिका सादर करण्याची आपली परंपरा कायम ठेवत, ‘स्टार प्लस’ वाहिनीने आजवर स्पर्श न केलेल्या आणखी एका विषयाला हात घातला आहे आणि ‘उडने की आशा’ ही नवी मालिका सादर केली आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हसोरा (सायली) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ या मालिकेत सचिन आणि सायली यांच्या प्रेमाची गाथा आणि नातेसंबंधांची गुंतागुंत पाहायला मिळणार आहे.
‘स्टार प्लस’ वाहिनीवर सादर होणाऱ्या ‘उडने की आशा’ या मालिकेतून एका पत्नीच्या भावभावनांच्या कल्लोळाचे चित्रण करण्यात आले आहे. ती तिच्या बेफिकीर पतीचे जबाबदार व्यक्तीत कसे परिवर्तन करते आणि याचा काही प्रमाणात संपूर्ण कुटुंबावर कसा परिणाम होतो, यावर बेतलेले हे नाट्य प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. कंवर ढिल्लन याने सचिनची भूमिका साकारली आहे, जो एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, तर नेहा हसोराने ‘उडने की आशा’ या मालिकेत सायली या फुलविक्रेतीची भूमिका साकारली आहे, जी वेगवेगळे छोटे व्यवसाय करत, या कामांतून आपला उदरनिर्वाह करते.
मालिकेच्या निर्मात्यांनी अलीकडेच या मालिकेचा एक रंजक प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात प्रेक्षकांना सचिन आणि सायलीच्या नात्यातील गुंतागुंत आणि सचिनचे त्याच्या पालकांशी असलेले बंध याची झलक पाहायला मिळाली.
प्रोमोप्रमाणेच, प्रोमोतील आवाजाविषयी प्रेक्षकांना मोठी उत्सुकता होती. ‘उडने की आशा’ या मालिकेच्या प्रोमोमधील जबरदस्त आवाज गुणी अभिनेता उपेंद्र लिमये यांचा आहे, ज्यांना ‘जोगवा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी (२००९) मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ या हिंदी चित्रपटातील उपेंद्र लिमये यांनी बजावलेल्या लहानशा मात्र अत्यंत रंजक भूमिकेला प्रेक्षकांची मोठी वाहवा मिळाली. ज्यात त्यांनी बंदूक विक्रेता- फ्रेडी विल्फ्रेड पाटीलची भूमिका साकारली आहे. उपेंद्र लिमये यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणावर काम केले आहे आणि असामान्य अभिनयाकरता त्यांचे नेहमीच कौतुक झाले आहे. ‘उडने की आशा’ च्या प्रोमोमधल्या त्यांच्या व्हॉईसओव्हरमधून सचिन आणि सायली यांची कथा प्रेक्षकांच्या काळजाला भिडते.
राहुल कुमार तिवारी निर्मित, ‘उडने की आशा’ लवकरच ‘स्टार प्लस’वर प्रसारित होईल.