- ज्ञानेश कुमार हे १९८८ च्या बॅचचे केरळ-केडरचे आयएएस अधिकारी
- डॉ. सुखबीर संधू हे उत्तराखंड केडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी
नवी दिल्ली : माजी निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांची निवृत्ती आणि अरुण गोयल यांनी नुकताच राजीनामा दिल्यामुळे निवडणूक आयोगात दोन निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त होती. नवीन निवडणूक आयुक्तांच्या निर्णयावर गुरुवारी पंतप्रधान यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक बोलाविण्यात आली होती, त्यानंतर सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ज्ञानेश कुमार हे १९८८ च्या बॅचचे केरळ-केडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांचा जन्म १९६४ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झाला. मे २०१६ मध्ये ज्ञानेश यांना गृह मंत्रालयात सहसचिव बनवण्यात आले. तर मेेे २०२२ मध्ये ज्ञानेश कुमार यांची सहकार मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी ज्ञानेश यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारी होती. त्यांनी सहकार मंत्रालयाचे सचिव तसेच संसदीय कामकाज मंत्रालयाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला आहे. गृहमंत्रालयात ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीदरम्यान कलम ३७० हटवण्यात आले होते.
उत्तराखंडचे मुख्य सचिव सुखबीर सिंग संधू यांनाही नवे निवडणूक आयुक्त बनवण्यात आले आहे. डॉ. सुखबीर सिंग संधू हे उत्तराखंड केडरचे १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. संधू हे मूळचे उत्तराखंड केडरचे अधिकारी आहेत. संधू यांनी उत्तराखंड सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी एसएएस संधू यांना प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आहे. धडाकेबाज अधिकाऱ्यांमध्ये त्यांची गणना होते. डॉ. संधू हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षणाचे अतिरिक्त सचिव होते. ते २०११ पर्यंत पंजाब सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. ते उधमसिंह नगर जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारीही होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री जनरल बीसी खंडुरी, विजय बहुगुणा आणि हरीश रावत यांचे सचिव म्हणूनही काम केले आहे. ते बादल सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. त्यांना उत्तराखंड सरकारमधील वित्त, कर्मचारी, औद्योगिक विकास यासह अनेक महत्त्वाच्या खात्यांचा अनुभव होता.