नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील भाजप सरकारने जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची माहिती दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून नवीन दर लागू होतील. देशाच्या राजधानीत पेट्रोलचा दर आता ९४.७२ रुपये प्रति लिटर असेल, जो सध्या ९६.७२ रुपये आहे. त्याचप्रमाणे डिझेल ८७.६२ रुपयांना मिळेल, जे सध्या ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. यापूर्वी गुरुवारी राजस्थान सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील वॅट दोन टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे एक-दोन दिवसात निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करू शकते.