ठाणे जिल्हा परिषदेत संविधान दिन उत्साहात साजरा


 उद्देशिकेचे सामूहिक वाचन, ग्रामीण भागात ‘उद्देशिका भिंत’ उपक्रम


ठाणे :  ठाणे जिल्हा परिषदेत संविधान दिनाचा उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.


उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी संविधानाची वैशिष्ट्ये, त्यातील मूल्ये आणि लोकशाही बळकटीसाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका यावर मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यक्षेत्रात पारदर्शकता, जबाबदारी आणि संविधान मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरूडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, नरेगा गट विकास अधिकारी प्राची साळसकर, महिला व बाल कल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, लेखाधिकारी सज्जला विसपुते, पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक) डॉ. किर्ती डोईजोडे, लेखाधिकारी रविंद्र सपकाळे यांसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


संविधान दिनाच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात “उद्देशिका भिंत” हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. गावांतील प्रमुख ठिकाणी आकर्षक भित्तीचित्रांच्या माध्यमातून भारतीय संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करण्यात आली. या उपक्रमात स्थानिक ग्रामीण कलाकार, स्वयंसहाय्य गट (SHGs), ग्रामीण युवा आणि स्थानिक समुदाय यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


पंचायत समिती भिवंडी अंतर्गत अंजूर, कल्याण तालुक्यातील जांभूळ, तसेच मुरबाड तालुक्यातील सिंगापूर या पंचायत लर्निंग सेंटरमध्ये (PLCs) विशेष जनजागृती कार्यक्रम झाले. उद्देशिकेतील लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांविषयी ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post