- ६० वर्षावरील नागरिकांना पूर्णपणे विनामूल्य प्रवास
- महिलांना ओळखपत्राची गरज नाही
- ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र अनिवार्य
- आयुक्त अभिजीत बांगर यांचे प्रशासनाला निर्देश
ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या बसेसमधून महिलांना तिकीटात ५० टक्के सवलत तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचा लाभ केवळ ठाण्यातील महिलांना देण्यात येत होता. यासाठी महिलांकडून स्थानिक रहिवासी असल्याचे ओळखपत्र दाखविणे गरजेचे होते त्यामुळे इतर महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आता आयुक्त अभिजीत बांगर यांनी सरसकट सगळ्याच महिलांना बस प्रवास मोफत असल्याचे जाहीर करत त्यासाठी कोणतेही ओळखपत्र किंवा वास्तव्याचा पुरावा यापैकी काहीही मागण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी परिवहन सेवेच्या प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बस प्रवास विनामूल्य असून त्यांना मात्र सोबत ओळखपत्र ठेवावे लागणार आहे.
परिवहन सेवेच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना ५० टक्के सवलतीच्या दरात तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा, या उद्देशाने ही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे ती सवलत सर्वच महिलांना लागू आहे. त्याबाबत, निर्माण झालेला संभ्रम, ओळखपत्रांची तपासणी यात होणारा कालपव्यय आणि वाद यांच्या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त बांगर यांनी परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांना ही सवलत योजना सरसकट लागू करण्याचे निर्देश दिले. तसेच, वाहक, तिकीट निरिक्षक यांना याबद्दल तातडीने माहिती द्यावी, असेही स्पष्ट केले आहे.
परिवहन सेवेच्या बसेसमध्ये, गर्दीच्या वेळेची प्रवासी संख्या व महिला प्रवाशांची वाढती संख्या पाहता महिलांना बसेसमध्ये आसन मिळत नसल्याने त्यांचा प्रवास त्रासदायक ठरून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसेसमध्ये डाव्या बाजूकडील सर्व सिट्स (दरवाजाकडील बाजू) महिलांसाठी राखीव ठेवण्यात येत आहेत, असे महापालिका आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. बसगाड्यांच्या उपलब्धतेनंतर गर्दीच्या वेळी ठराविक मार्गावर स्वतंत्र महिला बस सेवा सुरू करण्याचेही प्रयोजन असल्याचेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.
समाजाच्या जडणघडणीत महिलांचा वाटा नेहमीच अग्रेसर असतो. महिलांची आर्थिक सक्षमता, तसेच अर्थव्यवस्थेतील आणि विविध सामाजिक उपक्रमातील महिलांचे योगदान या बाबींना चालना मिळावी यासाठी महिलांनी अधिकाधिक संख्येने आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग नोंदविणे गरजेचे असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.