दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनीतील नागरिकांचा समावेश
दिवा, (आरती मुळीक परब) : मुंब्रा देवी कॉलनीतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मात्र या भागात प्रचंड समस्या असून मागील दहा वर्षात भीषण पाणीटंचाईचा सामना मुंब्रादेवी कॉलनीतील रहिवासी करत आहेत. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेने मार्फत निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिली आहे.
मुंब्रा देवी कॉलनी परिसरातील नागरिकांना प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरिकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या नागरिकांचे आर्थिक गणित मागील काही वर्षापासून बिघडलेले आहे. नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दुसरीकडे या भागात ड्रेनेज समस्या मोठ्या प्रमाणात असून कचऱ्याची समस्या देखील मुंब्रा देवी कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात आहे.
मौसम थिएटर ते वारेकर शाळा या भागात फुटपाथ वरून चालताना नागरिकांना दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गटारांची झाकणे तुटलेली आहेत. त्याचबरोबर फुटपाथ हे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागते. यामुळे अपघातांचा धोका निर्माण होतो. या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी व महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने मुंब्रा देवी कॉलनी परिसरात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. जिथे नागरिकांवर अन्याय होत असेल तिथे शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे मत रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केले आहे.