दिवा - वसई मासे विक्रेत्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता

Maharashtra WebNews
0

 


कायमस्वरूपी मच्छी मार्केट मिळावे, अशी महिलांची मागणी

दिवा,  :  दिवा स्टेशन परिसरात गेल्या १५ ते २० वर्षांपासून स्थानिक आगरी, कोळी महिला मासे विकत आहेत. त्यांना आतापर्यंत पालिकेतर्फे मार्केट ही उपलब्ध नाही. त्यात वसई वरुन मासे आणून इथे स्टेशनजवळ त्या कोळणी मासे विक्री करतात. दिव्यातील मासे विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे दिव्यात मासे विकणाऱ्या आणि वसई वरुन येऊन मासे विकणाऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.  

गेल्या दोन ते तीन पिढ्यांपासून दिवा स्टेशन, पूर्व तलावाजवळ आगरी, कोळी महिला मासे विक्री करतात. त्यांना पालिकेने अजूनही मार्केट उपलब्ध करुन दिलेले नाही. त्यांना फक्त डोक्यावरती शेड टाकून दिलेली आहे. या सगळ्या कोळणी १० ते १५ वर्षे मच्छी मार्केटसाठी पाठपुरावा पालिकेकडे करत असूनही त्यांना मार्केट मिळालेले नाही. त्यांची मासे विक्रेता म्हणून पालिकेकडे रितसर नोंद आहे. तरीही पालिकेतील अधिकारी चालधकलापणा करत असल्याते महिलांचे म्हणणे आहे.

त्यात अजून भर म्हणून वसई वरुन दिव्यात रिक्षा आणि छोटा टॅंम्पो भरुन मासे आणून वसईच्या कोळणी विक्री करत आहेत. त्यामुळे स्थानिक कोळणींना त्याचा फटका बसत आहे. त्या वसईच्या कोळणींच्या स्वतःच्या बोटी असल्याने ते दिव्यात मासे कमी दरात जास्त दिल्यामुळे ग्राहकांचा ओढा ही त्यांच्या कडेच असतो. त्याचा परिणाम दिव्यातील मासेविक्री व्यवसायावर झाला आहे. अशाने स्थानिक मासे विक्रेत्यांचे मासे शिल्लक राहिल्याने त्या दिव्यातील महिलांना आर्थिक नुकसान सोसावे लागते. 

स्थानिक कोळणींचा पूर्ण उदरनिर्वाह मासे विक्रीवर अवलंबून असल्या कारणाने त्यांच्या आमदानी मध्ये मोठ्या प्रकर्षाने घट झाली आहे. वसईच्या कोळणींच्या स्वतःच्या बोटी असल्याने त्यांना फक्त माल विकायचा असतो. तर दिव्यातील कोळणी सकाळी 3 वाजता उठून भाऊच्या धक्यावरुन मासे विकत आणून ते दिव्यात विकतात. त्यांचा माल न विकला गेल्यास आर्थिक फटका बसतो. पहिल्या एक ते दोनच वसई वरुन महिला येत असल्याने दिव्यातील आगरी महिलांना त्यांना उठवले नाही. मासे विक्री करु दिली पण आता त्यांच्या जागी ५ ते ६ वसईच्या महिला वसईवरुन जास्तीत जास्त मासे आणून दिव्यात विकल्याने दिव्यातील आगरी, कोळी संतापल्या आहेत. त्याचा परिणाम संघर्षामध्ये होऊ शकतो.    

बाहेरुन आलेल्या महिला शिळे, खराब, कीड लागलेले मासे स्वस्त दराने विकतात. त्याचा परिणाम दिव्यातील नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वेळा त्यांना स्थानिक महिलांनी या वसईच्या कोळणींना बंदी घालण्यात आली तरी सुद्धा ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्या वसई आणि दिव्यातील मासे विक्रेत्यांमध्ये वादविवाद होऊन पोलिसांमध्ये तक्रार केली असता पोलीस सुद्धा त्यांची तक्रार घेऊन दिव्याच्या महिलांची तक्रार न घेता खोटेनाटे आरोप करून जागेवरून उठवतात. स्थानिक मासे विक्रेत्यांची ठाणे महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या दिवा प्रभाग समितीमध्ये मासे विक्री म्हणून नोंद असून पालिकेने त्यांना आयडी कार्ड ही दिलेले आहे.

 गेल्या १० ते १५ वर्षांपासून दिव्यातील भूमिपुत्र मच्छी मार्केटसाठी पाठपुरावा उपमहापौर रमाकांत मढवी यांच्याकडे करत आहेत. तर मासेविक्री हा त्यांच्या तीन पिढ्यांपासूनचा व्यवसाय आहे. तर दिव्याच्या भूमिपूत्र असणाऱ्या कोळणींना कायमस्वरूपी मच्छीमार्केट पलिकेतर्फे करून दिल्यास हे बाहेरून आलेल्या मासे विक्री करणाऱ्यांशी वादावादी होणार नाही. तसेच यावर पालिकेने लवकरात लवकर तोडगा न काढल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही कारण, असे मासे विक्रेत्या महिलांनी सांगितले आहे. 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)