- ८४०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार
- दोन्ही कॉरिडॉरचे काम मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होणार
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या दोन नवीन कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. यासाठी ८४०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की पहिला कॉरिडॉर लाजपत नगर ते साकेत जी ब्लॉक दरम्यान असेल. त्याची लांबी ८.४ किलोमीटर असेल. तर, दुसरा कॉरिडॉर इंद्रलोक ते इंद्रप्रस्थ दरम्यान असेल, ज्याची लांबी १२.४ किलोमीटर असेल. या दोन्ही कॉरिडॉरचे काम मार्च २०२९ पर्यंत पूर्ण होईल असे देखील ठाकूर यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, इंद्रलोक आणि इंद्रप्रस्थ दरम्यान बांधण्यात येणाऱ्या १२.३७७ किलोमीटरच्या कॉरिडॉरमधून ग्रीन लाइनचा विस्तार केला जाईल. याच्या प्रवाशांना लाल, पिवळी, एअरपोर्ट लाईन, मॅजेन्टा, व्हायलेट आणि ब्लू लाईन सोबत अदलाबदल करण्याची सुविधा मिळेल. या कॉरिडॉरच्या माध्यमातून हरियाणातील बहादूरगड भागातील लोकांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.
आठ स्थानकांचा समावेश
लाजपत नगर आणि साकेत दरम्यान बांधण्यात येणारा मेट्रो ब्लॉक सिल्व्हर, मॅजेन्टा, पिंक आणि व्हायलेट लाईनला जोडेल. त्यावर आठ स्थानके असतील आणि ती पूर्णपणे उन्नत असेल.