नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत भाजपने दिल्लीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपने पाचपैकी चार जागांवर नवे उमेदवार उभे करून धक्का दिला आहे. हे चौघेही पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या जागी बांसुरी स्वराज यांना नवी दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. बांसुरी स्वराज कोण आहेत ते जाणून घेऊया.
बांसुरी स्वराज या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत. त्यांचा जन्म १९८२ मध्ये दिल्लीत झाला.बांसुरी स्वराज यांची २००७ मध्ये बार कौन्सिल ऑफ दिल्लीमध्ये नोंदणी झाली होती. त्यांना विधी व्यवसायाचा सुमारे दीड दशकाचा अनुभव आहे. त्यांनी वॉरविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बीए (ऑनर्स) पदवी प्राप्त केली.
त्यानंतर बांसुरी यांनी लंडनमधील प्रतिष्ठित बीपीपी लॉ स्कूलमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी कायद्यात बॅरिस्टरची पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेंट कॅथरीन कॉलेजमधून मास्टर ऑफ स्टडीज पूर्ण केले. बांसुरी यांनी अनेक हायप्रोफाईल ग्राहकांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या व्यावसायिक पोर्टफोलिओमध्ये करार, रिअल इस्टेट, कर, आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवाद तसेच अनेक फौजदारी खटल्यांचा समावेश आहे. स्वराज यांची खासगी प्रॅक्टिस चालवण्यासोबतच हरियाणा राज्यासाठी अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या वर्षी भाजपने बाांसुुुरी स्वराज यांना दिल्ली राज्याच्या लॉ सेलचे राज्य सहसंयोजक बनवले होते. यावेळी भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवले आहे.
भाजपने ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, पश्चिम दिल्लीतून कमलजीत सिंह शेरावत, दक्षिण दिल्लीतून रामवीर सिंग बिधुरी, नवी दिल्लीतून बांसुरी स्वराज, चांदनी चौकातून प्रवीण सिंग खंडेलवाल यांना तिकीट दिले आहे. नवी दिल्लीतील मीनाक्षी लेखी, चांदनी चौकातील डॉ. हर्षवर्धन, पश्चिम दिल्लीतील प्रवेश वर्मा आणि दक्षिण दिल्लीतील रमेश बिधुरी यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत.