कामगार दिनानिमित्त मानवतेचा सन्मानार्थ उपक्रम
हातकणंगले \ रुपेश आठवले : नागाव ग्रामपंचायतीने जागतिक कामगार दिनाला एक वेगळा अर्थ दिला. सत्तेच्या खुर्चीतून नव्हे, तर समाजाच्या पाया असलेल्या श्रमिकांच्या सन्मानातून. ग्रामपंचायतीने गावातील घंटागाडी चालक विक्रम जयपाल कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून समाजाला मोलाचा संदेश दिला.
हा क्षण विक्रम कांबळे यांच्यासाठी केवळ अभिमानाचा नव्हता, तर त्यांच्या जीवनातील एक असामान्य वळण होता. परंतु त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ही कृती ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या विचारांची उंची दाखवणारी ठरली. काम करणाऱ्या हातांचा सन्मान म्हणजेच खऱ्या अर्थाने कामगार दिनाचा आत्मा.
कार्यक्रमाला सरपंच विमल शिंदे, उपसरपंच सुधीर पाटील, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.