काँग्रेसची ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलेल्या पहिल्या यादीत राहुल गांधी यांना वायनाड, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना राजनांदगाव, शशी थरूर यांना तिरुअनंतपुरममधून तिकीट देण्यात येणार असल्याचे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना केसी वेणुगोपाल म्हणाले की, पहिल्या यादीतील १५ नावे सर्वसाधारण प्रवर्गातून आणि २४ नावे एसटी, एससी आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील असल्याचे म्हटले आहे.
२०१९ साली राहुल गांधी यांनी वायनाड आणि अमेठी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. राहुल गांधी सध्या केरळमधील वायनाडचे खासदार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली होती.
यावेळी मात्र ते पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढवणार का? हा प्रश्न अद्याप कायम आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना त्यांच्या तिरुअनंतपुरम या मतदारसंघातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून तिकीट दिले आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांना काँग्रेसने छत्तीसगडच्या राजनंदगाव या मतदारसंघातून तिकीट दिले आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांचादेखील समावेश आहे. ते केरळमधील अलापुझ्झा या जागेवरून निवडणूक लढवतील. २००९ साली वेणूगोपाल यांनी याच जागेवर विजयी कामगिरी करून दाखवली होती. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे बंधू डी के सुरेश यांनादेखील काँग्रेसने पहिल्याच यादीत तिकीट दिले आहे. ते बंगळुरू ग्रामीण या मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
भाजपचा हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर भाजपने हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत केरळच्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, यादी जाहीर केल्याबद्दल काँग्रेसला शुभेच्छा, पण यावेळी केरळमधून काँग्रेसला धक्का बसेल अशी भविष्यवाणी करत राहुल गांधी वायनाड व्यतिरिक्त कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवू शकत नसल्याचे सांगितले.