गाळे अधिकृत असल्याचा गाळेधारकांचा दावा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : रस्ता रुंदीकरणात अनधिकृत गाळे अडथळा ठरत असून या गाळ्यांना पालिकेची कोणतीही परवानगी नसल्याचे सांगत सोमवार १ एप्रिल रोजी डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा येथील काही गाळे जमीनदोस्त करण्यात आले. मात्र हे गाळे अधिकृत असून पालिकेची ही कारवाई योग्य नसल्याचा दावा येथील गाळेधारकांनी केला आहे. पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जेसिबीच्या कारवाई केली.
सोमवारी सकाळच्या सुमारास पालिकेचे `ह` प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त राजेश सावंत, पालिकेचे कर्मचारी व जेसीबी हे डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा परिसरात आले होते. येथील काही गाळे रस्ता रुंदीकरणात अडथळा होत असल्याने पालिकेने यापूर्वी नोटीस बजावून गाळे रिकामी करण्यास सांगितले होते. पालिकेची कारवाई सुरु होत असल्याचे पाहताच गाळेधारकांनी कारवाईवर आक्षेप घेतला.मात्र हे गाळे अनधिकृत असून कारवाई होणारच या भूमिकेवर ठाम होते. कारवाई सुरु असताना पोलिसांनी गाळेधारकांना बाजुला केले.
या गाळ्यांवर कारवाई होऊ नये याकरता मागणी होत होती. या गाळ्यांना पालिकेची कोणतीही परवागनी नाही. त्यामुळे हे गाळे अनधिकृत असून ही कारवाई योग्य आहे. या गाळेधारकांना पालिका प्रशासनाने यापूर्वी नोटीस बजावून गाळे रिकामे करण्यासाठी वेळ दिला होता मात्र तरीही गाळे रिकामी केले नाहीत. हे गाळे रस्ता रुंदीकरणाच्या आड येत असून गटारावर बांधले आहेत. शासनाने ही जमीन पालिकेकडे रस्ता रुंदीकरण हस्तांतरित केली आहे.
-सहाय्यक आयुक्त राजेश सावंत
अनेक वर्षापासून येथे गाळे असून यावर अनेकांचा उदरनिर्वाह होत आहे. हे गाळे अनधिकृत नाहीत. आचारसंहिता सुरु असून पालिका प्रशासनाकडून कारवाई करत आहे. आमची मागणी आहे कि गाळे तोडू नका. आमचे आधीच खूप नुकसान झाले असून आमच्यावर अन्याय करू नका.याआधी पालिकेने गाळे तोडले होते. आम्ही पालिकेला सहकार्य केले होते. ही कारवाई कोणाच्या दबावाखाली होत आहे. इतर ठिकाणी अनधिकृत गाळे, बांधकाम आहेत त्यावर पालिका का कारवाई करत नाही.
-गाळेधारक