डोंबिवली स्फोट प्रकरण : अमुदान कंपनीच्या मालकाला पोलीस कोठडी

 


 डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीमध्ये गुरुवारी भयानक स्फोट झाले होते. यामध्ये आतापर्यंत सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अमुदान नावाच्या केमिकल कपंनीत झालेल्या स्फोटानंतर मालक मलय मेहतासह संचालक असलेल्या त्याच्या आईला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने मलय मेहताला दि.२९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मलय मेहता यांची आई वयस्कर असल्याने त्यांना घरीच ठेवण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. मलय मेहताच्या आईला पोलिसांनी नाशिक येथून अटक केली होती.

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासायनिक प्रक्रिया आणि साठवणुकीमध्ये खबरदारी न घेतल्याने हा स्फोट झाला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील फेज दोनमधील प्लांटमध्ये गुरुवारी झालेला हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू आणि ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी एक दिवसापूर्वीच मालक आणि संचालकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. एफआयआरमध्ये मलय प्रदीप मेहता, मालती प्रदीप मेहता आणि इतर संचालक, व्यवस्थापन कर्मचारी आणि कारखान्यावर देखरेख करणारे अधिकारी यांची नावे आहेत. 

एफआयआरनुसार, अधिकाऱ्यांनी रसायने मिसळताना आणि साठवताना खबरदारी घेतली नाही, एका छोट्याशा चुकीमुळे स्फोट होऊ शकतो. हे माहीत असतानाही निष्काळजीपणा केला. स्फोटानंतर सुमारे १२ तासांनंतर शुक्रवारी पहाटे दीड वाजता ठाणे जिल्ह्यातील मानपाडा पोलिसांनी एफआयआर दाखल केली.


Post a Comment

Previous Post Next Post