पातंजल योगदर्शन - निरंतर साधना या पुस्तकाचे प्रकाशन



डोंबिवली : "उपनिषदांच्या काळापासून भारतीय तत्त्वचिंतकांनी मानवी अस्तित्व शोधण्याचा केलेला प्रयत्न, तसेच भौतिक जगापलिकडे असलेल्या गूढ अशा सृष्टीच्या परमतत्वापर्यंत मानवी अस्तित्व पोहोचू शकते का? याचा शोध घेण्याचे सर्वोत्तम साधन म्हणजे योगसाधना."

योगदर्शनाविषयी असे मौलिक विचार डॉ. अरुणाताई ढेरे यांनी, डॉ. धनश्री साने लिखित पातंजलयोगदर्शन - निरंतर साधना या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी व्यक्त केले. पै. फ्रेण्ड्स लायब्ररी व धनंजय साने कुटुंबियांतर्फे गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहामध्ये २५ मे २०२४ रोजी डॉ. धनश्री धनंजय साने लिखित पातंजल योगदर्शन - निरंतर साधना या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका कवयित्री, ललित लेखिका, माजी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष, डॉ. अरुणा ढेरे व श्रधेय अलकाताई मुतालिक यांच्या शुभ हस्ते झाले.


हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रसिध्द झाले. या कार्यक्रमात डॉ. धनश्री साने यांनी आपल्या मनोगतामध्ये या लेखनामागची भूमिका विषद करून पातंजल योगदर्शन म्हणजे फक्त योगासने नसून वैयक्तिक उन्नतीसाठी अष्टांगयोगातील यम नियमांचे महत्व स्पष्ट केले. 'योग मार्गात समाधीपर्यन्त पोहोचणे ही जन्मजन्मांतरीची साधना आहे, हा मार्ग अवघड असला तरी अशक्य नाही' असे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच श्रद्धेय अलकाताई मुतालिक यांनी योगमार्गातील परंपरेचा संदर्भ देऊन प्रस्तृत ग्रंथातील विवेचन केलेल्या विषयांचा अभ्यासपूर्ण परामर्श घेतला. पुस्तकातील आशयाची मांडणी, आकलन सुलभशैली यांचे उदाहरणासह विवेचन करून पुस्तकाचा परिचय करून दिला.

या कार्यक्रमात पै सरांचे प्रास्तविक व प्रकाशक सुदेश हिंगलासपुरकर यांचे मनोगतही सादर केले गेले. खूप मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. अनेक मान्यवर, अभ्यासक, जिज्ञासू या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मयुरेश साने याने केले तर प्रारंभीचे असणारे गीत गंधार जाधव आणि गाथा जाधव यांनी अतिशय सुंदर योगपर असणारे गीत सादर केले. आणि अबोली ठोसर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. 




Post a Comment

Previous Post Next Post