- प्रवासी वाहतूक सेवा नसल्याने पर्यटकांचे हाल
- अलिबाग एसटीबस स्थानकात लांबच लांब रांगा
अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : रायगड जिल्ह्याचे समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी फुलून गेले आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या तालुक्यांच्या विविध किनारपट्टीवर पर्यटक माैजमजा करताना दिसत आहेत. आता समुद्रातील साहसी खेळांना बंदी असली तरी असंख्य पर्यटक आपल्या कुटुंबासह समुद्र स्नानासह किनाऱ्यावरील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेताना पहायला मिळत आहेत. रविवारपासून जलवाहतूक सेवा बंद झाल्याने पर्यटक घरी पोहोचण्यासाठी एसटी सेवेकडे वळले होते.
आगामी पावसाळ्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने अलिबाग तालुक्यातील मांडवा ते मुंबईतील गेटवे ही प्रवासी जलवाहतूक सेवा २६ मेपासून पुढील तीन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे गेली काही दिवसात जलमार्गाने पर्यटनासाठी अलिबाग, मुरुड भागात आलेल्या पर्यटकांची जलवाहतूक सेवा बंद झाल्याने चांगलीच कोंडी झाली. घरी परतण्यासाठी एसटी बसचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे रविवारी सकाळपासून अलिबाग एसटीबस स्थानकात पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
रायगड जिल्हयातील पर्यटनाचा सर्वात मोठा हंगाम सध्या सुरु आहे. जिल्हयातील माथेरानसह समुद्र किनारपट्टी भागातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन येथे सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे. अद्याप आठ ते दहा दिवस हा हंगाम सुरु राहणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात सध्या लाखो पर्यटक आलेले आहेत. अलिबाग आणि मुरुड तालुक्यात मुंबई आणि ठाणे या शहरातील पर्यटकांची संख्या अधिक असते. या पर्यटकांना जलमार्गाने अलिबाग, मुरुड गाठणे अधिक सोयीस्कर असते. त्यामुळे मुंबईतील गेट-वे ते अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदर या मार्ग दररोज हजारो पर्यटक दाखल होतात.
रायगड किंवा अलिबागमध्ये जाणाऱ्यांना स्वस्त दरात आणि कमी वेळेत अलिबाग गाठणे या जलवाहतुकीमुळे शक्य होते. असंख्य पर्य़टकही या जलवाहतुकीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पीएनपी, मालदार, अजंठा, अपोले या कंपन्यांच्या बोटी मांडवा ते गेट वे जलवाहतूक मार्गावर प्रवासी सेवा देतात. वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई-गेटवे ते मांडवा या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. मात्र पावसाळा सुरु होणार असल्याने या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे आता मांडवाहून मुंबईला येणाऱ्यांना व मांडवाहून गेटवे-मुंबईला जाण्यासाठी रस्ते मार्गानेच प्रवास करावा लागणार आहे.
रविवारपासून हा जलवाहतूक बंदी कालावधी सुरू झाला. रविवारी घरी निघालेल्या पर्यटकांना जलवाहतूक बंद झाल्याने एसटी बस सेवेचा आधार घ्यावा लागला. रविवारी सकाळपासून अलिबाग एसटीबस स्थानकात पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उन्हात उभे राहून पर्यटकांना तिकिटासाठी प्रतिक्षा करावी लागत होती. तर मांडवा ते भाऊचा धक्का मार्गावरील रो-रो सेवा ही पावसाळ्यातही सुरू असते. मात्र ती सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याने इतर जलवाहूतक सेवेचा ते आधार घेत असतात.
दरम्यान, अलिबाग एसटी बस स्थानकात एसटी बस मिळविण्यासाठी पर्यटकांच्या रांगांच रांगा लागल्या होत्या. स्थानक पर्यटकांनी तुटूंब भरून गेले होते. वाढलेल्या गर्दीने अलिबाग एसटी आगार व्यवस्थापनाला आवश्यक एसटी बसेस पुरविताना तारेवरची कसरत करावी लागत होती.
आज ही जलवाहतूक बंद झाल्याने तेथील प्रवासी एसटी स्थानकात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणातील प्रवाशांसाठी एसटी बसेसची व्यवस्था करणे शक्य नाही. तरी अलिबाग-पनवेल मार्गावर २०-२५ जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. पर्यटकांसाठी जास्तीत जास्त बसेस सोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- अजय वनारसे, व्यवस्थापक, अलिबाग एसटी बस आगार