- दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार
- जखमींवर शासनामार्फत उपचार
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील अमुदान या कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर सात ते आठ कर्मचारी जखमी झालेत. घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार. मृत्यू झाला आहे त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये देण्यात येतील. जे जखमी आहेत, त्यांना देखील शासनाकडून मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यापूर्वीही डोंबिवलीत प्रोब्रेस कंपनीत स्फोट होऊन अनेकजण मृत्यूमुखी पडले होते. अमुदान कंपनीत घडलेल्या घटनेच्या चौकशीत समोर आले आहे की, या स्फोटाची तीव्रता गंभीर होती. या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींना देखील तडे गेले आहेत. आजूबाजूला काही जण अडकले असून बचाव कार्य सुरू आहे. यापूर्वी देखील एक स्फोट झाला होता. त्यात देखील अनेकांचा मृत्यू झाला होता.
डोंबिवलीत अनेक धोकादायक केमिकल कंपन्या आहेत, त्यामुळेच त्यांची ए, बी, सी या क्रमवारीत विभागणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर जास्त धोकादायक केमिकल कंपनी आहेत त्या तत्काळ बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा कंपनींनी कोणाच्याही जीविताला धोका होणार नाही अशा प्रकारचा उद्योग सुरू करावा. अनेक जणांनी यापूर्वी तक्रार केली होती. मात्र दुर्दैवाने जी काळजी घेणे अपेक्षित होती ती काळजी घेण्यात आलेली नाही.
या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करू, जे दोषी आढळून येतील त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. सगळ्याच एमआयडीसी परिसरात अशा पद्धतीची काळजी घेतली जाईल. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. शहराच्या बाहेर शिफ्ट व्ह्याव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत.