प्रशासनाकडून दिव्यात मतदान जन जागृतीवर कानाडोळा
दिवा, (आरती मुळीक परब) : लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत मतदानाची टककेवारी वाढावी याकरता पालिका प्रशासनाकडून मतदारांमध्ये जन जागृती केली जाते. कल्याण लोकसभा मधील सहा विधानसभेमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन राजकीय पक्षांकडून व उमेदवारांकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र दिवा शहरात मतदान जन जागृतीकडे पालिका प्रशासनाने आणि जिल्हा निवडणूक कार्यालयाचे लक्ष नसल्याचे दिवावासियांकडून बोलले जात आहे. या निवडणुकीत ७५ % मतदान व्हावे म्हणून प्रशासनाने ढोल जरी बडवला असला तरी वास्तविक दिव्याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.
या माध्यमातून प्रशासनाकडून मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाची टक्केवारी वाढावी याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु दिव्या सारख्या सुशिक्षीत शहराकडे प्रशासन पाठ दाखवत मतदान वाढीसाठी कुठलाही प्रयत्न केला नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात दिवा शहर ही येते याचा विसर पालिका प्रशासनाला किंवा जिल्हा निवडणूक आयोगाला झाला असावा अशी दिवावासियांमध्ये चर्चा आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांचा सहभागी वाढविण्यास स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. तर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविकांकडून मतदान जागृती, पथनाट्य, शपथ, फ्लॅश मॉबद्वारे तरुणांची मतदान जागृती, मतदान यंत्रांच्या प्रतिकृती असलेल्या मॅस्कॉट मार्फतही जागृती होत असली तरी दिव्यात मात्र अशी कोणत्याही प्रकारे मतदान जागृती होत नसल्याचे नागरिक सांगत आहेत. तसेच कचऱ्याच्या घंटागाड्यांवरील ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर करून 'मतदारराजा जागा हो' हा संदेश दिव्यात कुठेच पोहोचला नसल्याचे नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. दिवा शहर तसेच आजूबाजूच्या इतर गावांमध्ये ही मतदान जागृती होत नसल्याने हे ठाणे महापालिकेत येत नाही का असा सवाल दिवावासिय विचारत आहेत.
डोंबिवली नंतर दिवा रेल्वे स्थानक हे गर्दीचे स्थानक म्हणून बघितले जाते. दिवावासियांचा जीव घेणा रेल्वे प्रवास, प्रचंड वाहतूक कोंडी, अनेक वर्ष न सुटलेला पाणी प्रश्न, कोकणात जाण्याऱ्या एक्स्प्रेस मेलला दिव्यात थांबा नसणे, वाढती शेअर रिक्षांची भाडी, अनधिकृत बांधकामांच्या वाढत्या प्रमाणामुळे दिव्याची वाढती लोकसंख्या त्यामुळे दिव्यात पालिकेच्या मिळणाऱ्या सोयीसुविधांवर येणारा प्रचंड ताण या कारणास्तव दिवा वासिय प्रचंड नाराज आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात दिवा शहरातील हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न अनेक वर्षापासून सुटले नसल्याने मतदारांची नाराजी कशी दूर होईल याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यात प्रशासनाने दिवा शहरात मतदान जनजागृती केली नसल्याने निवडणुकीच्या दिवशी दिवा शहरात मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन आठवड्यांवर मतदान आले असले तरी दिव्यातील कोणत्याही गावात वा मुख्य शहरात कुठेही मतदानावर जन जागृती झालेली नाही. तसेच प्रत्येक वेळी मतदानासाठी आम्हाला लांबच्या बुथवर जावे लागते. मी स्वतः दिवा पूर्वेतील बेडेकर भागात रहात असलो तरी माझे बुथ हे दिवा पश्चिम अथवा दातिवली येते. त्यामुळे एकच गोंधळ उडतो. अशाने काही नागरिक मतदान करायला घराच्या बाहेर पडत नाहीत.- सचिन गावडे, नागरिक
.jpeg)