Gurmeet ram rahim Acquitted : रणजित सिंह हत्या प्रकरणात गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका


पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय 

पंजाब : बहुचर्चित रणजित सिंह हत्या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राम रहीमला मोठा दिलासा देत त्याला निर्दोष घोषित केले आहे.  याप्रकरणी सीबीआय कोर्टाने राम रहीमला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
गुरमीत राम रहीमचे वकील जतिंदर खुराना यांनी सांगितले की, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या आदेशात बदल करत यातील पाचही जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. 

राम रहीमने जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. मंगळवारी त्यांच्या अपिलावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. याप्रकरणी सविस्तर आदेश येणे बाकी आहे.

 रणजित सिंग हा सिरसा डेराचा व्यवस्थापक होता. २२ वर्षांपूर्वी एका संशयावरून रणजित सिंगची हत्या करण्यात आली होती.  रणजित सिंग हा कुरुक्षेत्र, हरियाणाचा रहिवासी होता. १० जुलै २००२ रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 

 एका निनावी साध्वीने माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून साध्वी लैंगिक अत्याचारप्रकरणी राम रहीमच्या 
चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणी माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना जे निनावी पत्र पाठविण्यात आले होते, ते पत्र रणजित सिंहने आपल्या बहिणीच्या माध्यमातून लिहिले असल्याचा संशय डेरा प्रबंधक यांना आला होता.

हे तेच निनावी पत्र आहे जे सिरसाचे पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी त्यांच्या ‘पुरा सच’ या संध्याकाळच्या वर्तमानपत्रात प्रकाशित केले होते. त्यामुळे २४ ऑक्टोबर २००२ रोजी पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला होता. रामचंद्र यांचे २१ नोव्हेंबर २००२ रोजी अपोलो हॉस्पिटल, दिल्ली येथे निधन झाले.  

पोलिसांच्या तपासावर असमाधानी असलेल्या रणजित सिंग यांचा मुलगा जगसीर सिंग याने जानेवारी २००३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय तपासाची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने मुलाच्या बाजूने निकाल देत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. या प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने राम रहीमसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. २००७ मध्ये न्यायालयाने आरोपींवर आरोप निश्चित केले होते. या प्रकरणात सुरुवातीला डेरामुखीचे नाव नसले तरी २००३ मध्ये सीबीआयकडे तपास सोपवण्यात आल्यानंतर २००६ मध्ये राम रहीमचा ड्रायव्हर खट्टा सिंग याच्या वक्तव्याच्या आधारे या हत्या प्रकरणात डेराप्रमुखाचे नाव समोर आले होते.

 २०२१ मध्ये सीबीआय कोर्टाने गुरमीत राम रहीमसह पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. साध्वी लैंगिक शोषणप्रकरणी राम रहीम सिंगला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या राम रहीम रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे.  



 

Post a Comment

Previous Post Next Post