नवी दिल्ली : उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागांमध्ये सुरू असलेली कडक उष्मा आणि विजेची वाढती मागणी या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलासा देणारी बातमी दिली आहे. केरळमध्ये लवकरच मान्सून दाखल होईल, असे विभागाचे म्हणणे आहे. तसेच यंदा मान्सून अधिक काळ राहणार असल्याचे देखील हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, येत्या पाच दिवसांत केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाला सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. विभागाने केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख ३१ मे दिली आहे, तर साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचणार आहे. याशिवाय मान्सून १८-२० जून दरम्यान उत्तर प्रदेश, २३-२५ जून रोजी वाराणसी आणि गोरखपूर आणि १०-११ जून रोजी मुंबई, महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या वेगाने मान्सून २९ जूनला दिल्लीत पोहोचेल. मान्सूनचे लवकर आगमन झाल्याने उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस, सप्टेंबरपर्यंत उत्तर-पश्चिम भारतात सामान्य पाऊस आणि देशाच्या मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.