नवी दिल्ली: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी हे संपूर्ण देशाचे हॉट सीट बनले आहे, कारण येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे २४ ते ३० तास उरले आहेत. असे असतानाही काँग्रेसने अद्याप येथे उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, राहुल गांधी (Rahul gandhi) ३ मे रोजी अमेठीतून उमेदवारी दाखल करणार असल्याच्या बातम्या पक्षातून येत आहेत. गांधी परिवारातील सदस्य आणि काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राहुल गांधी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेठी आणि रायबरेलीमधून गांधी घराण्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिल्लीतील वकिलांची एक टीम बुधवारी रात्री रायबरेलीला पोहोचली. यामध्ये ज्येष्ठ वकील केसी कौशिक यांचाही समावेश आहे.
ज्येष्ठ वकील केसी कौशिक दिल्लीहून अमेठीत आल्याने गांधी घराण्यातील एक सदस्य रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते अनिल सिंह यांनी दावा केला आहे की, “राहुल गांधी उद्या म्हणजेच शुक्रवारी दुपारी १२ वाजता अमेठीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. गांधी कुटुंबातील सदस्य आणि पक्षातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा या नामांकनात समावेश असेल. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राहुल गांधी विक्रमी मतांनी विजयी होतील.
दुसरीकडे, अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून राहुल आणि प्रियंका गांधीच उमेदवार असतील, असा दावा काँग्रेसच्या सूत्रांनी केला आहे. कोण कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार हे सध्या निश्चित झालेले नाही. उमेदवारी अर्जाच्या तयारीसाठी दिल्ली आणि प्रदेश काँग्रेस कार्यालयातून वाहने पाठवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भूमाळ आणि मुन्शीगंज गेस्ट हाऊसची स्वच्छता केली जात आहे. याशिवाय बाहेरून येणारे नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुक्कामासाठी अमेठी आणि रायबरेलीमध्ये हॉटेल्सचे बुकिंगही करण्यात आले आहे.
याशिवाय सोनिया गांधींचे प्रतिनिधी केएल शर्मा बुधवारी तयारीचा आढावा घेण्यासाठी अमेठीत पोहोचले. येथे त्यांनी ब्लॉक स्तरावरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना ३ मे रोजी नामांकनासाठी तयार राहण्यास सांगितले. ३ मे ही अमेठी आणि रायबरेलीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
भाजपने देखील रायबरेलीचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. स्मृती इराणी या विद्यमान खासदार आहेत. उत्तर प्रदेशच्या काँग्रेस नेतृत्वाने केंद्रीय निवडणूक समितीला अमेठीतून राहुल गांधी आणि रायबरेलीमधून प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्याचे आवाहन केले आहे. राहुल गांधी २००४ पासून सलग तीन वेळा अमेठीचे खासदार आहेत.
२०१९ मध्ये त्यांचा स्मृती इराणीकडून पराभव झाला होता. केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. रायबरेलीच्या संदर्भात प्रियांका गांधी यांच्या नावाची सातत्याने चर्चा होत होती. मात्र, काही तासांतच चित्र स्पष्ट होईल की, अमेठी आणि रायबरेली लोकसभा जागांसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल?