अलिबाग: (धनंजय कवठेकर) : गुरुवारी वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नागाव ग्रामपंचायतीतर्फे पाल्हे रोडवर वडाच्या ३० रोपांची लागवड करण्यात आली. सरपंच हर्षदा मयेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला ज्या वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात त्या वडाच्या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. वड, पिंपळ यासारखी झाडे मोठ्या प्रमाणावर प्राणवायू देतात. पशुपक्ष्यांना अन्नही देतात. म्हणूनच पंचायतीच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे हर्षदा मयेकर यांनी सांगितले.
या रोपांच्या लागवडीबरोबरच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी देखील ग्रामपंचायतीने घेतली आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्वेता कदम, प्रियंका कोठे, रोहिणी घरत, वीणा पिंपळे यांच्यासह इतर महिला येथे उपस्थित होत्या.