लोणावळा, (श्रावणी कामत) : रविवारी दिनांक २३ जून रोजी शिवसेवा प्रतिष्ठानवर प्रेम करणारे वृक्षप्रेमी सकाळी नऊ वाजता पवन मावळातील येळसे या गावी एकत्र जमले. यामध्ये पुणे, मुंबई तसेच मावळ तालुक्यातील अनेक कार्यकर्ते एकत्र आले. येळसे गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी सुद्धा सहभाग घेतला. नवनाथ ठाकर यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
वृक्षारोपणासाठी योग्य जागा शोधून त्या ठिकाणी खड्डे घेण्याचे काम आधीच करून ठेवले होते. तसेच सर्व पाहुण्यांसाठी चहा नाष्ट्याची व्यवस्था सुद्धा गावकऱ्यांनी आनंदाने व अत्यंत चांगल्या पद्धतीने केली होती. शिवसेवा प्रतिष्ठानचा हा दरवर्षीचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम. पावसाळ्याचे आगमन लक्षात घेऊन हा कार्यक्रम करण्याचे नियोजन यावर्षी पवन मावळात केले. वृक्षारोपण करण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठानने अत्यंत काळजीपूर्वक झाडांची निवड केली होती. सर्व देशी झाडे जसे आंबा, जांभळ फणस, जाम, कडुलिंब, बेल, चिंच, वड, पिंपळ या झाडांची प्रामुख्याने निवड केली. या सर्व झाडांवर वेगवेगळे पक्षी आनंदाने घरटी करतात व नांदतात. त्यांना त्यांचे अन्न या झाडांपासूनच मिळते.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईहून अॅड. ऋतुजा आंबेकर तसेच पुण्याहुन मिलिंद भणगे, लोनावळ्यातून ॲड. संजय वांद्रे माननीय दत्तात्रय येवले, मनोज लौळकर तसेच शिवसेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते संचालक सहभागी झाले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला.
सर्व ग्रामस्थांनी अत्यंत काळजीने झाडांचे संवर्धन करू असे सांगितले. लोणावळ्यातील कारखानदार राजीव देशपांडे यांच्या सहकार्याने येळसे या गावातील जिल्हा परिषद शाळेचे कंपाउंड चे काम शिवसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले. शिवसेवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
शिवसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, प्रमोद देशपांडे, राजेश कामठे, राजेश येवले, भगवान गायकवाड व शिवसेवा प्रतिष्ठानचे सर्व सभासद यांनी अथक परिश्रम घेतले.